
मुंबई : मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या एका रिपोर्टनुसार, देशातील मोठ्या खासगी बँका आता गोल्ड लोन म्हणजेच सोनं तारण कर्ज क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत. या क्षेत्रात होणारी मोठी वाढ, आकर्षक परतावा आणि ग्राहकांकडून वाढलेली मागणी यामुळे खासगी बँका या स्पर्धेत उतरल्या आहेत. यामुळे जास्त रकमेच्या गोल्ड लोन मार्केटमधील त्यांचा वाटा वाढू शकतो, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
रिपोर्टनुसार, आतापर्यंत खासगी बँकांची गोल्ड लोन क्षेत्रात मर्यादित उपस्थिती होती. कारण या व्यवसायात नफा मिळवण्यासाठी सुरुवातीला मोठी गुंतवणूक करावी लागते. सोनं तारण कर्जासाठी खास शाखा, सोनं पारखणारे तज्ज्ञ, सुरक्षित तिजोरी (व्हॉल्ट) आणि खास ऑपरेटिंग सिस्टीम उभारावी लागते. इतर रिटेल कर्जांच्या तुलनेत यातून परतावा मिळायलाही जास्त वेळ लागतो. याउलट, गोल्ड लोन देणाऱ्या NBFCs आणि सरकारी बँकांचं ग्रामीण आणि निमशहरी भागात मोठं जाळं आहे. कर्ज देण्याची जलद प्रक्रिया, कमी कागदपत्रं आणि ग्राहकांशी असलेले जुने संबंध यामुळे त्यांचा फायदा होतो. इतकंच नाही, तर बँकांच्या पारंपरिक कर्ज नियमांमध्ये बसत नसलेल्या काही ग्राहकांनाही NBFCs कर्ज देतात.
मात्र, गोल्ड लोनमध्ये होणारी मोठी वाढ, कमी धोका आणि चांगला नफा, सोबतच ग्राहकांचा वाढता कल यामुळे आता मोठ्या खासगी बँकाही या क्षेत्रात उतरत आहेत. यासाठी त्या खास शाखा, विशेष टीम, डिजिटल माध्यमातून ग्राहक मिळवणे आणि ऑटोमेशन यावर भर देत आहेत. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, "येत्या काळात यामुळे स्पर्धा तीव्र होईल, विशेषतः शहरी भागात आणि मोठ्या रकमेच्या कर्ज सेगमेंटमध्ये." असं असलं तरी, ग्रामीण भागात आणि ज्या ग्राहकांना जलद, सोप्या आणि लवचिक सेवेची गरज आहे, तिथे गोल्ड लोन NBFCs चं वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे.
खासगी बँकांचा हा विस्तार त्यांच्या कर्ज वितरणाच्या आकडेवारीतून स्पष्ट दिसतोय. HDFC बँकेचं गोल्ड लोन पोर्टफोलिओ आर्थिक वर्ष २६ मध्ये ३४ टक्क्यांनी वाढून २३७ अब्ज रुपये झाला आणि जून २०२६ मध्ये तो २५५ अब्ज रुपयांवर पोहोचला. ॲक्सिस बँकेचा पोर्टफोलिओ आर्थिक वर्ष २६ मध्ये २३ टक्क्यांनी वाढून १३३ अब्ज रुपये झाला. IDFC फर्स्ट बँकेचं गोल्ड लोन बुक आर्थिक वर्ष २६ मध्ये ७९ टक्क्यांनी वाढून ३९ अब्ज रुपये झालं आणि जूनपर्यंत ते ४९ अब्ज रुपयांवर पोहोचलं. तर AU बँकेचा पोर्टफोलिओ दुप्पट होऊन ३९ अब्ज रुपयांवर आणि जूनमध्ये ४५ अब्ज रुपयांवर गेला. RBL बँकेचं कर्जवाटप आर्थिक वर्ष २५ मधील ४ अब्ज रुपयांवरून आर्थिक वर्ष २६ मध्ये थेट ४३ अब्ज रुपयांवर पोहोचलं, तर बंधन बँकेने ५७ टक्क्यांची वाढ नोंदवत ३० अब्ज रुपयांचं कर्जवाटप केलं.
रिपोर्टनुसार, इतर मोठ्या NBFCs कडूनही स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन बुकमध्ये गेल्या तीन वर्षांत ८६% CAGR (वार्षिक चक्रवाढ वाढीचा दर) दराने वाढ झाली असून, जून २०२६ पर्यंत ते २१० अब्ज रुपयांवर पोहोचलं आहे. कंपनीने मार्च २०२७ पर्यंत ३०० अब्ज रुपयांचं लक्ष्य ठेवलं आहे. IDFC फर्स्ट बँक आणि AU बँकही वेगाने आपला पोर्टफोलिओ वाढवत आहेत. रिपोर्टचा अंदाज आहे की, आर्थिक वर्ष २०२६ ते २०२८ दरम्यान संपूर्ण गोल्ड लोन उद्योग २८% CAGR दराने वाढेल, ज्यामध्ये मोठ्या खासगी बँका आणि मोठ्या NBFCs चा बाजारातील वाटा वाढेल.