ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, 1 जूनपासून लागू होणार नवा नियम

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं ड्रायव्हिंग लायसन्सबाबत नव्या नियमांची घोषणा केली आहे. त्यानुसार आता लायसन्स काढणे हे अधिक सोपे होणार आहे.

Rameshwar Gavhane | Published : May 22, 2024 10:21 AM IST

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं ड्रायव्हिंग लायसन्सबाबत नव्या नियमांची घोषणा केली आहे. त्यानुसार आता लायसन्स काढणे हे अधिक सोपे होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये हेलपाटे घालण्याची गरज नाही. तुम्ही सरकारमान्य खासगी संस्थेतही ही परीक्षा देऊ शकता. त्यामुळे वाहनचालकांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. त्याचबरोबर अल्पवयीन व्यक्तींनी वेगानं वाहन चालवल्यास त्यांना अधिक दंड बसणार आहे.

अल्पवयीन वाहनचालकांना मोठा दंड

जवळपास 9 लाख जुन्या सरकारी वाहनांना बाद करणे तसेच कार उत्सर्जन नियमांना लागू करत प्रदूषणाची पातळी कमी करणे हा नव्या नियमांचा उद्देश आहे. नव्या नियमांनुसार वेगानं वाहन चालवण्यासाठी 1 हजार ते 2 हजार रुपये दंड आहे. पण, अल्पवयीन व्यक्ती वेगानं वाहन चालवताना पकडली गेल्यास त्याला 25,000 रुपये दंड भरावा लागेल. त्याचबरोबर त्या वाहन मालकाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल. तसंच त्या अल्पवयीन व्यक्तीला 25 वर्षांपर्यंत लायसन्स न मिळण्याची तरतूद नव्या नियमांमध्ये आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स काढणे सोपे

1 जूनपासून लागू होणाऱ्या RTO च्या नियमानुसार सरकारमान्य संस्थेमध्येही तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला टेस्ट देण्यासाठी आरटीओ ऑफिसमध्ये जावं लागणार नाही. ड्रायव्हिंग सेंटरसाठी देखील विशेष नियम आहेत. त्यानुसार त्यांच्याकडं किमान 1 एकर जमीन हवी. ती संस्था चारचाकी वाहनांचं प्रशिक्षण देत असेल तर त्यांच्याकडं दोन एकर जमीन आवश्यक आहे. ड्रायव्हिंग स्कुलमध्ये टेस्ट घेण्यासाठी विशेष सुविधा असणे आवश्यक आहे. प्रशिक्षकांकडं किमान हायस्कूल डिप्लोमा तसंच पाच वर्ष ड्रायव्हिंगचा अनुभव असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या नियमांचीही माहिती आवश्यक आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठी 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. पण, 50 सीसी क्षमतेच्या वाहनांसाठी 16 व्या वर्षी देखील लायसन्स मिळू शकतं. पण, वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे लायसन्स अपडेट करणे आवश्यक आहे.

 

Share this article