Meta Child Safety : इन्स्टाग्रामवरील लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा, केंद्राने मेटाला कसा लावला चाप?

Published : Sep 17, 2026, 04:58 PM IST
Meta Child Safety : इन्स्टाग्रामवरील लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा, केंद्राने मेटाला कसा लावला चाप?

सार

सोशल मीडियावर लहान मुलांच्या सुरक्षेबाबतचे गुन्हे आता थेट 'इंडियन सायबर क्राईम पोर्टल'वर रिपोर्ट करण्यास मेटा (Meta) कंपनीने होकार दिला आहे.

मुंबई : सोशल मीडियावर एखादी पोस्ट काही सेकंदात जगभर व्हायरल होते. पण अलीकडच्या काळात लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि गैरवर्तणुकीचे व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल होण्याचं प्रमाण वाढलंय, ही खूप चिंतेची बाब आहे. विशेषतः इन्स्टाग्रामसारख्या मेटाच्या प्लॅटफॉर्मवर लहान मुलांच्या शोषणाचे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

केंद्र सरकारची मेटाला नोटीस, लहान मुलांशी संबंधित तक्रारी

असे बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी आणि लहान मुलांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून सतत पावलं उचलली जात आहेत. याच तक्रारींची दखल घेत, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) मेटा कंपनीला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं होतं.

सायबर क्राईम पोर्टलला मेटा थेट माहिती देणार

यानंतर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर लहान मुलांच्या सुरक्षेबाबत येणाऱ्या तक्रारी आणि बेकायदेशीर पोस्ट्सची माहिती थेट 'इंडियन सायबर क्राईम पोर्टल'ला देण्यास मेटाने सहमती दर्शवली आहे. हे पोर्टल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर' (I4C) द्वारे चालवलं जातं.

विशेष म्हणजे, याआधी मेटा कंपनी लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित माहिती अमेरिकेतील 'नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन' (NCMEC) या संस्थेला देत होती.

याचा फायदा कोणाला आणि कसा होणार?

या नव्या निर्णयामुळे लहान मुलांचे ऑनलाइन लैंगिक शोषण आणि गैरवर्तन लवकर शोधून काढता येईल. तसेच, ही माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचल्याने कारवाईला वेग येईल.

भारतीय सायबर क्राईम पोर्टलवर महिला आणि लहान मुलांविरुद्धच्या सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी आधीपासूनच एक स्वतंत्र विभाग आहे. यात तुमची ओळख गुप्त ठेवूनही तक्रार करता येते. शिवाय, तुम्ही केलेल्या तक्रारीचं पुढे काय झालं, हे ऑनलाइन ट्रॅक करण्याची सुविधाही यात आहे.

आता मेटाकडून सर्व माहिती आणि पुरावे थेट भारतीय तपास यंत्रणांना मिळणार असल्याने, दोषींवर भारतीय कायद्यानुसार कडक कारवाई करणं सोपं होणार आहे.

सामान्य नागरिक काय करू शकतात?

तुम्हाला इंटरनेटवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत किंवा इतर कोणतीही बेकायदेशीर पोस्ट आढळल्यास, तुम्ही भारत सरकारच्या 'नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल'वर जाऊन थेट तक्रार नोंदवू शकता.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Volvo XC60 Plug-in Hybrid: व्हॉल्वोच्या नव्या हायब्रिड SUV कार्स, रेंज पाहून थक्क व्हाल!
D Mart Offers : डी-मार्टमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या 10 वस्तू, संपूर्ण लिस्ट पाहाच