
मुंबई : समजा, तुम्हाला अचानक मेसेज येतो की तुमच्या खात्यातून पैसे काढले गेलेत किंवा दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर झालेत. पण तुम्ही असा कोणताही व्यवहार केलेला नसतो. तुम्ही खातं चेक करता आणि पाहता की ४०,००० रुपये गायब झालेत. अशा वेळी बहुतेकांना प्रश्न पडतो की बँकेला फोन केल्यावर हे पैसे परत मिळतील का? खात्यातून पैसे चोरीला गेले तर बँक ते परत देते का?
यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) स्पष्ट नियम आहेत. ग्राहकाच्या परवानगीशिवाय पैसे कट झाले, तर त्याचं नुकसान कोणी सोसायचं, हे फसवणूक कशी झाली यावर अवलंबून असतं. काही वेळा बँक पूर्ण पैसे परत करते, तर काही प्रकरणांमध्ये ग्राहकालाच फटका बसतो.
खात्यातून पैसे गायब झाल्याचं लक्षात येताच, फसवणूक कशी झाली याचा विचार करत बसू नका. सर्वांत आधी बँकेला याची माहिती द्या. आपण हा व्यवहार केलेला नाही, हे स्पष्ट सांगून तक्रार नोंदवा. त्यानंतर बँकेकडून तक्रार नोंदवल्याचा नंबर (Complaint Number) नक्की घ्या. आणखी पैसे कट होण्याची शक्यता वाटत असेल, तर खात्यावरील व्यवहार किंवा यूपीआय (UPI) पेमेंट ब्लॉक करायला सांगा.
झालेल्या व्यवहाराची रक्कम, तारीख आणि ट्रान्झॅक्शन आयडी लिहून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बँकेकडून आलेले मेसेज आणि व्यवहाराचा तपशील जपून ठेवा. याशिवाय, १९३० या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवरही लगेच कॉल करून माहिती द्या. वेळेत तक्रार केल्यास, तुमचे पैसे पुढच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर होण्यापासून रोखता येऊ शकतात.
जर बँकेच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीमुळे तुमच्या खात्यातून पैसे गेले असतील, तर आरबीआयच्या नियमांनुसार ग्राहकाला कोणताही भुर्दंड बसत नाही. अशा वेळी तुम्ही लगेच तक्रार केली नाही, तरीही नुकसानीची जबाबदारी ग्राहकाची नसते.
आणखी एका परिस्थितीत ग्राहकाला त्याचे पूर्ण पैसे परत मिळण्याचा अधिकार आहे. समजा, बँक किंवा ग्राहक या दोघांचीही चूक नाही, पण एखाद्या थर्ड पार्टीच्या सिक्युरिटी सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने फसवणूक झाली. अशा वेळी, बँकेकडून मेसेज आल्यापासून ३ कामकाजाच्या दिवसांच्या (Working Days) आत ग्राहकाने तक्रार केली, तर त्याला नुकसानीची झळ बसत नाही. म्हणजेच, अशा प्रकरणात ग्राहकाची 'झिरो लायबिलिटी' (Zero Liability) असते.
तक्रार मिळाल्यापासून १० कामकाजाच्या दिवसांच्या आत बँकेने ती रक्कम तात्पुरती ग्राहकाच्या खात्यात जमा करणं बंधनकारक आहे. याला 'शॅडो रिव्हर्सल' (Shadow Reversal) असं म्हणतात. बँक या फसवणुकीचा तपास सुरू ठेवू शकते. पण तपास पूर्ण होईपर्यंत ग्राहकाला पैसे परत करण्यासाठी बँकेला वाट पाहता येत नाही.
तुमची किंवा बँकेची चूक नसताना थर्ड पार्टीमुळे झालेल्या फसवणुकीत, तक्रार करायला उशीर झाला तर मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं.
४ ते ७ कामकाजाच्या दिवसांत तक्रार केल्यास - आरबीआयने ठरवून दिलेली मर्यादा किंवा तुमची चोरीला गेलेली रक्कम (यापैकी जे कमी असेल) तेवढंच तुमचं नुकसान मानलं जाईल.
७ कामकाजाच्या दिवसांनंतर तक्रार केल्यास - तुमचे पैसे परत मिळणं हे पूर्णपणे बँकेच्या धोरणावर (Policy) अवलंबून असेल.
त्यामुळे तुम्ही प्रवासात असाल किंवा कितीही कामात असाल, तरीही खात्यात काही संशयास्पद व्यवहार दिसल्यास क्षणाचाही विलंब न करता बँकेला कळवा.