
मुंबई : QR कोड स्कॅन करणं आता आपल्या रोजच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलंय. या डिजिटल क्रांतीने आता जागतिक पातळीवर एक नवा विक्रम नोंदवलाय. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) नुकतीच अधिकृत आकडेवारी जाहीर केलीये. यानुसार, एकट्या ऑक्टोबर महिन्यात देशात तब्बल ३१.५३ लाख कोटी रुपयांचे UPI व्यवहार झाले आहेत.
याचाच अर्थ, भारतीय लोक दररोज सरासरी १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम फक्त मोबाईलवरून डिजिटल स्वरूपात ट्रान्सफर करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात एकूण २,५४७ कोटी व्यवहारांची नोंद झालीये. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात २३ टक्क्यांची मोठी वाढ झालीये. भारत कॅशलेस सोसायटीकडे किती वेगाने वाटचाल करतोय, याचाच हा पुरावा आहे.
पण या सगळ्यामागे एक मोठा आर्थिक धोकाही लपलेला आहे. आर्थिक तज्ज्ञ याला 'पेनलेस स्पेंडिंग' (विनात्रास खर्च) असं म्हणतात. पूर्वी खिशातून नोटा मोजून देताना पैसे संपत असल्याची जाणीव व्हायची. पण आता UPI मुळे आपण किती पैसे खर्च करतोय, याचा हिशोबच लागत नाही. त्यामुळे महिन्याच्या शेवटी खातं रिकामं होतं आणि मध्यमवर्गीयांची मोठी अडचण होते.
या डिजिटल मायाजालात वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत -
तुमचा महिन्याचा पगार ज्या खात्यात जमा होतो किंवा जिथे तुमची आपत्कालीन बचत आहे, ते मुख्य बँक खातं कधीही UPI ला जोडू नका. त्याऐवजी, रोजच्या किरकोळ खर्चासाठी एक वेगळं खातं उघडा. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या बजेटनुसार फक्त ५,००० रुपये किंवा १०,००० रुपये त्या खात्यात ट्रान्सफर करा. ती रक्कम संपली की तुमचा खर्च आपोआप थांबेल.
दिवसातून अनेकदा आपण चहा-नाश्त्यासाठी १० रुपये, २० रुपये किंवा ५० रुपयांचे छोटे खर्च करतो. यासाठी UPI लाईटचा वापर करा. यात पिन न टाकताही पटकन पेमेंट होतं. शिवाय, तुमच्या मुख्य बँक पासबुकमध्ये छोट्या व्यवहारांची मोठी यादीही तयार होत नाही.
एका दिवसात जास्तीत जास्त किती UPI पेमेंट करायचं, याची मर्यादा आपण स्वतः UPI ॲप्समध्ये सेट करू शकतो. आपत्कालीन परिस्थिती वगळता, दिवसाला जास्तीत जास्त २,००० रुपये किंवा ३,००० रुपयांची मर्यादा नक्की सेट करा.
तुम्ही दिवसभर पैसे खर्च करत असताना, राऊंड-अप किंवा मायक्रो-SIP सारख्या ॲप्सचा वापर करा. यातून प्रत्येक व्यवहारातील ५ रुपये किंवा १० रुपये आपोआप इंडेक्स फंडमध्ये जमा होतात. यामुळे जसा तुमचा खर्च होईल, तशी तुमची बचतही वाढत जाईल.