
सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे, असं एक अहवाल सांगतो. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी, हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो हे समजून घेणे आवश्यक आहे. हृदयरोग हा अनेकदा विविध घटक आणि जीवनशैली यांच्या एकत्रित परिणामामुळे होतो. चुकीच्या जीवनशैलीतील बदलांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका वाढला आहे. निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो, असे तज्ज्ञ सांगतात.
धूम्रपानासोबतच लठ्ठपणाही खूप वाढला आहे. हे हृदयविकाराच्या झटक्याचे आणि हृदरोगाचे एक प्रमुख कारण आहे. जास्त प्रमाणात मद्यपान करणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे एक मोठे कारण आहे. यासोबतच, वाढता ताणतणाव आणि चुकीचा आहार ही हृदरोगामागील इतर अनेक कारणे आहेत, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
धूम्रपानाची सवय हे हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, जे लोक वयाच्या 15 व्या वर्षापूर्वी धूम्रपान सुरू करतात, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता खूप जास्त असते. तथापि, संशोधकांचे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या चाळीशीपूर्वी धूम्रपान सोडले, तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 90 टक्के टाळता येते.
आनुवंशिकता हे आणखी एक कारण आहे. तज्ज्ञांच्या मते, कुटुंबात कोणाला हृदयाशी संबंधित समस्या असल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता खूप जास्त असते. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल ही हृदयविकाराच्या झटक्याची इतर प्रमुख कारणे आहेत. या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवून हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
व्यायामाचा एकूण आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. यामुळे मधुमेह, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. धूम्रपान, अतिमद्यपान यांसारख्या चुकीच्या सवयी सोडल्यानेही हृदयविकाराचा धोका कमी होतो.