
Litchi Seed Planting Guide: उन्हाळ्यात मिळणारी रसाळ लिची खाल्ल्यानंतर बहुतेक जण तिची बी कचरा समजून फेकून देतात. पण तुम्हाला माहित आहे का, की याच बी पासून एक सुंदर लिचीचं रोप तयार होऊ शकतं? बी रुजवण्याची योग्य पद्धत वापरली, तर साधारण एका आठवड्यातच त्याला कोंब फुटू शकतो. तुमच्याकडे गार्डन, बाल्कनी किंवा टेरेस गार्डन असेल, तर हा सोपा गार्डनिंग प्रोजेक्ट तुमच्यासाठी एकदम भारी ठरू शकतो.
लिचीचं रोप लावण्यासाठी सगळ्यात आधी ताजी आणि चांगल्या क्वालिटीची लिची निवडा. फळ खाऊन झाल्यावर बी बाहेर काढून पाण्याने स्वच्छ धुवा, जेणेकरून त्यावरचा सगळा गर निघून जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा की सुकलेल्या बियांची उगवण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे बी काढल्या काढल्या लगेच ते लावण्याची तयारी करा.
बी २४ तासांसाठी स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर, एका ओल्या टिश्यू पेपरमध्ये किंवा कपड्यात गुंडाळून ते एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा. त्यात ओलावा टिकून राहील याची काळजी घ्या, पण जास्त पाणी घालू नका. साधारण ५ ते ७ दिवसांत बीला तडा जाईल आणि त्यातून छोटासा कोंब बाहेर आलेला दिसेल. हेच लक्षण आहे की बी आता कुंडीत लावण्यासाठी तयार आहे.
कोंब फुटलेलं बी चांगला निचरा होणाऱ्या मातीत साधारण १ ते २ इंच खोल लावा. कुंडीसाठी गार्डनची माती, कंपोस्ट आणि वाळू यांचं मिश्रण वापरणं जास्त चांगलं ठरतं. माती हलकी ओलसर ठेवा आणि कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे थेट ऊन येणार नाही, पण पुरेसा प्रकाश मिळेल. जास्त ऊन किंवा पाण्यापासून रोपाचं संरक्षण करणं गरजेचं आहे.
रोप थोडं मोठं झाल्यावर त्याला रोज सकाळी काही तासांचं कोवळं ऊन द्या. वेळोवेळी सेंद्रिय खत किंवा वर्मीकंपोस्ट घालत राहा. नियमित पाणी आणि योग्य काळजी घेतल्यास रोपाची वाढ झपाट्याने होते. अर्थात, बी पासून तयार झालेल्या लिचीच्या झाडाला फळं यायला बरीच वर्षं लागतात, पण तुमच्या गार्डनची शोभा वाढवणारं हे एक आकर्षक रोप नक्कीच बनेल.