
मुंबई : आजकाल ऑनलाइन चॅटिंगमध्ये इमोजी हा आपल्या संवादाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लांबलचक मेसेज टाइप करण्याऐवजी, एका छोट्याशा इमोजीमधून लोक आपल्या भावना आणि विचार अगदी सहज व्यक्त करतात. पण गेल्या काही वर्षांत, लोक जे इमोजी सर्वाधिक वापरतात, त्यात खूप बदल झाला आहे.
गुगल ट्रेंड्सच्या एका नव्या अभ्यासातून २०२० ते २०२६ या काळात इमोजीचा ट्रेंड कसा बदलत गेला, हे समोर आलं आहे. यातील काही इमोजी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत, तर काहींचा वापर ऑनलाइन चॅटिंगमध्ये एका विशिष्ट अर्थाने खूप लोकप्रिय झाला आहे.
पूर्वी हसताना डोळ्यातून पाणी येणारा इमोजी सगळीकडे वापरला जायचा. पण आताच्या तरुण पिढीने ऑनलाइन भावना व्यक्त करण्याची पद्धतच बदलून टाकली आहे. २०२० पासून प्रत्येक वर्षी कोणत्या इमोजीने इंटरनेटवर राज्य केलं आणि त्यातून लोकांचा मूड कसा दिसला, यावर एक नजर टाकूया.
हसून हसून वेडं पिसाट करणारा हा तिरपा इमोजी २०२६ मधील सर्वात लोकप्रिय ट्रेंड म्हणून समोर आला आहे. विनोद आणि ऑनलाइन कंटेंटवर अतिशयोक्तीपूर्ण प्रतिक्रिया देण्याची लोकांची आवड यातून दिसून येते.
तरुण इंटरनेट युजर्स आता इमोजीचा वापर कसा करतात, हे यातून स्पष्ट होतं. नेहमीचे इमोजी त्यांच्या मूळ अर्थापेक्षा आता उपहासात्मक किंवा भावना वाढवून सांगण्यासाठी जास्त वापरले जात आहेत.
गुगल ट्रेंड्सच्या डेटानुसार, चिमटी काढणारा हा हाताचा इमोजी या वर्षात सर्वाधिक भाव खाऊन गेला. याचा अर्थ तुम्ही तो कुठे वापरता यावर अवलंबून असतो. कधी मस्करीत, कधी "तुला काय हवंय?" असं विचारण्यासाठी, तर कधी एखादी गोष्ट अगदी 'परफेक्ट' आहे हे सांगण्यासाठी याचा वापर होतो.
इंटरनेटच्या भाषेत आणि गमतीशीर चॅटिंगमध्ये या इमोजीने आपली वेगळीच जागा निर्माण केली आहे.
नकारार्थी मान हलवणारा हा इमोजी २०२४ मध्ये खूप गाजला. एखाद्या गोष्टीला नकार देण्यासाठी किंवा असहमती दर्शवण्यासाठी याचा सर्रास वापर होतो. स्पष्ट 'नाही' म्हणण्यापासून ते मस्करीत नकार देण्यापर्यंत सगळ्यासाठी हा इमोजी चालतो.
रोजच्या संवादात लोक आता शब्दांऐवजी इमोजीचा कसा वापर करत आहेत, हे यातून दिसतं.
२०२३ मध्ये गुलाबी रंगाच्या हार्ट इमोजीने सर्वांची मनं जिंकली. लाल रंगाचं हार्ट सहसा प्रेम किंवा तीव्र भावनांसाठी वापरलं जातं. पण गुलाबी हार्ट आदर, जिव्हाळा, मैत्री आणि सौम्य प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरलं जातं. डिजिटल संवादात लोक आता हार्ट इमोजीचा किती वेगवेगळ्या प्रकारे वापर करत आहेत, हे याच्या लोकप्रियतेवरून सिद्ध होतं.
वितळणाऱ्या चेहऱ्याच्या इमोजीने २०२२ मधील लोकांचा मूड अचूक टिपला. याचा अर्थ थोडा संदिग्ध आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला लाज वाटते, अस्वस्थ वाटतं, थकवा येतो किंवा ताण असतो, तेव्हा हा इमोजी कामी येतो. एखादी गोष्ट पाहून तुम्ही भारावून गेलात, हे मस्करीत सांगण्यासाठीही याचा वापर होतो.
२०२१ मध्ये सुटकेचा निश्वास टाकणारा हा इमोजी खूप चर्चेत होता. एखाद्या तणावपूर्ण प्रसंगानंतरची सुटका, थकवा किंवा खूप दडपण आल्याची भावना यातून व्यक्त होते. संदर्भावर अवलंबून, जेव्हा एखादी गोष्ट पाहून तुमचे शब्दच हरवतात, तेव्हाही हा इमोजी वापरला जातो.
२०२० मध्ये डोळे, तोंड आणि पुन्हा डोळे असा हा विचित्र कॉम्बिनेशनचा इमोजी खूप ट्रेंडमध्ये होता. जेव्हा लोक स्तब्ध होतात, धक्का बसतो किंवा एखाद्या विचित्र परिस्थितीत "आता आपण काय करू शकतो?" असा विचार करतात, तेव्हा हा इमोजी वापरला गेला. इंटरनेट आणि सोशल मीडियावर लोकांनी या कॉम्बिनेशनला लगेच डोक्यावर घेतलं.
ही बदलती यादी सांगते की इमोजी संस्कृती कधीच एका जागी थांबत नाही. मीम्स, सोशल मीडिया ट्रेंड्स आणि नव्या पिढीच्या वापरामुळे एका साध्या इमोजीचा अर्थही पूर्णपणे बदलू शकतो.