
मुंबई : फ्लिपकार्ट आता भारतातल्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये एन्ट्री मारणार आहे. स्विगी आणि झोमॅटोला तगडी टक्कर देण्यासाठी फ्लिपकार्ट या महिन्याच्या अखेरीस आपली नवीन सेवा सुरू करू शकतं. सध्या कंपनीने जेवण ऑर्डर करून घरी पोहोचवण्याच्या या सेवेची चाचणी सुरू केली आहे.
टेकक्रंचच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, फ्लिपकार्ट 'ईट-इन बाय मिनिट्स' (Eat-in by Minutes) या नावाने ही नवीन फूड डिलिव्हरी सर्व्हिस टेस्ट करत आहे. सध्या बंगळुरूमध्ये याचा पहिला टप्पा सुरू आहे. फ्लिपकार्टच्या 'फ्लिपकार्ट मिनिट्स' या क्विक कॉमर्स सेवेशी जोडूनच या नव्या सेवेला हे नाव दिल्याची चर्चा आहे. या महिन्याच्या अखेरीस ही सेवा लाँच होऊ शकते, पण सुरुवातीला ती कोणत्या शहरांमध्ये मिळेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
यावर फ्लिपकार्टने अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या वर्षी जुलैमध्ये फ्लिपकार्ट ग्रुपचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी फूड डिलिव्हरी सेवा सुरू करण्याच्या योजनेला दुजोरा दिला होता.
सध्या ही चाचणी फक्त कंपनीच्या कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे. सुरुवातीला काही शे कर्मचाऱ्यांवर सुरू असलेली ही टेस्टिंग आता जवळपास ८,००० कर्मचाऱ्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. फ्लिपकार्टच्या शॉपिंग ॲपमध्ये या नव्या सेवेसाठी एक वेगळा टॅब देण्यात आला आहे. फ्लिपकार्ट मिनिट्स आणि ट्रॅव्हल बुकिंगसारख्या सेवांसोबतच आता फूड डिलिव्हरीचा पर्यायही दिसेल.
सरकारी पाठबळ असलेल्या 'ओएनडीसी' (ONDC - Open Network for Digital Commerce) वर लिस्टेड असलेल्या हॉटेल्स आणि फ्लिपकार्टसोबत थेट करार केलेल्या रेस्टॉरंट्सचा या नव्या सेवेत समावेश असेल. ग्राहकांपर्यंत जेवण पोहोचवण्यासाठी फ्लिपकार्टची लॉजिस्टिक शाखा असलेल्या 'ई-कार्ट'च्या (eKart) नेटवर्कचा वापर केला जाईल. क्विक कॉमर्ससाठी काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजपेक्षा फूड डिलिव्हरीचे कर्मचारी वेगळे असतील. बंगळुरूमध्ये 'ईट-इन बाय मिनिट्स' लिहिलेले टी-शर्ट घातलेले डिलिव्हरी बॉईज दिसल्याचंही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
सध्या भारतातील फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये झोमॅटो आणि स्विगीचीच मक्तेदारी आहे. केन रिसर्चच्या (Ken Research) आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये झोमॅटोचा मार्केट शेअर ५८ टक्के होता, तर स्विगीचा वाटा जवळपास ३४ टक्के होता. रॅपिडो (Rapido) नेही 'ओन्ली' (Only) या नावाने फूड डिलिव्हरी सुरू केली आहे, पण ती फक्त काही ठराविक भागातच मिळते. याआधी उबर, ॲमेझॉन आणि गुगलसारख्या बड्या कंपन्यांनीही या क्षेत्रात हात आजमावला होता, पण त्यांना फारसं यश मिळालं नाही. २०२० मध्ये उबरने आपला 'उबर ईट्स'चा भारतातील व्यवसाय झोमॅटोला विकला होता.
या क्षेत्रात स्पर्धा खूप असली तरी, भारतातील ऑनलाइन फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये वाढीची मोठी संधी आहे. ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनच्या (Bernstein) आकडेवारीनुसार, एकूण फूड सर्व्हिस मार्केटमध्ये ऑनलाइन डिलिव्हरीचा वाटा सध्या फक्त १५ टक्क्यांहून अधिक आहे. पण हे मार्केट दरवर्षी १८% ते २०% च्या वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत फ्लिपकार्टच्या एन्ट्रीमुळे भारतातील फूड डिलिव्हरी मार्केटमधली स्पर्धा आणखी रंगतदार होणार हे नक्की.