
मुंबई : भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे आणि यावरून देशभरात एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. सरकार आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील काही जण E20 पेट्रोलच्या बचावासाठी रेसिंग स्पर्धांची उदाहरणं देत आहेत. त्यांचा दावा आहे की इथेनॉलमुळे गाडीची कामगिरी सुधारते. पण ३०० किमी प्रतितास वेगाने धावणारी रेसिंग कार आणि आपली रोजच्या वापराची गाडी यांची तुलना करणं इतकं सोपं नाही.
सुरुवातीला E20 पेट्रोल सर्व पंपांवर उपलब्ध करण्यासाठी २०३० पर्यंतची मुदत होती. पण ही मुदत ५ वर्षांनी कमी करून २०२५-२६ करण्यात आली. आता तर १ एप्रिल २०२६ पासून E20 हेच सर्वसामान्य पेट्रोल पंपांवर मिळणारं मुख्य इंधन असेल. म्हणजे, इथेनॉलशिवायचं शुद्ध पेट्रोल आता फक्त महागडा 'प्रीमियम' पर्याय म्हणून शिल्लक राहील.
या निर्णयामुळे E0 (शून्य टक्के इथेनॉल) किंवा कमी इथेनॉलसाठी डिझाइन केलेल्या लाखो जुन्या गाड्यांच्या मालकांपुढे कोणताही पर्याय उरलेला नाही. ज्या वेगाने हा बदल लागू केला जातोय, पंपांवर स्पष्ट माहितीचा अभाव आणि मायलेज कमी होऊनही दरात कोणतीही सवलत मिळत नसल्याने अनेकजण टीका करत आहेत.
सरकार जे रेसिंगचं उदाहरण देतंय, ते अर्धवट आहे. फॉर्म्युला १ (F1) गाड्यांमध्ये कधीच २० टक्के इथेनॉल वापरलं गेलं नाही. त्यांनी अनेक वर्षं E10 पेट्रोल वापरलं, जे आता भारताने बंद केलं आहे. उलट, F1 आता १०० टक्के सिंथेटिक इंधनावर चालते.
इंजिनच्या आयुष्याची तर तुलनाच होऊ शकत नाही. NASCAR सारख्या रेसिंग कारचं इंजिन साधारणपणे ८०० ते १५०० किलोमीटर चालल्यावर पूर्णपणे मोडून पुन्हा तयार केलं जातं. तर, आपल्या सामान्य गाड्या २ ते ३ लाख किलोमीटरपर्यंत इंजिन न उघडता चालाव्यात अशी अपेक्षा असते.
इंधन हाताळण्याची पद्धतही वेगळी असते. रेसट्रॅकवर, इंधन ताजं तयार केलं जातं आणि काही तासांतच वापरलं जातं. पण आपल्या गाड्यांमध्ये आणि पेट्रोल पंपांवर इंधन कित्येक आठवडे पडून राहतं. इथेनॉलची एक खासियत आहे - ते हवेतील दमटपणा किंवा पाणी शोषून घेतं (hygroscopic).
विशेषतः पावसाळ्यात किंवा मुंबई-कोकणासारख्या दमट हवामानाच्या ठिकाणी, जास्त पाण्यामुळे 'फेस सेपरेशन' (phase separation) होऊ शकतं. यात पेट्रोल वर तरंगतं आणि पाणी-इथेनॉलचं जड मिश्रण टाकीच्या तळाशी बसतं. पंपावरील मशीन खालून पेट्रोल खेचते, त्यामुळे हे मिश्रण गाडीत जाऊन गाडी बंद पडण्याचा किंवा इंजिनला गंज लागण्याचा धोका वाढतो.
सोशल मीडियावर मायलेज ३०% कमी झाल्याचे जे दावे केले जात आहेत, ते अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत आणि आकडेवारीही तेच सांगते. तरीही, मायलेज कमी होतंच, कारण इथेनॉलची ऊर्जा क्षमता (calorific value) कमी असते. नीती आयोगाच्या (NITI Aayog) २०२१ च्या अहवालानुसार, जुन्या गाड्यांमध्ये (E0 डिझाइन) E20 मुळे ६ टक्के ते ७ टक्के मायलेज कमी होऊ शकतं. मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) E20 मुळे ३ टक्के ते ३.५ टक्के मायलेज कमी होईल असं म्हटलं आहे.
ब्राझीलमध्ये मात्र वेगळा मार्ग निवडला आहे. तिथे सुमारे ८० टक्के नवीन गाड्या 'फ्लेक्स फ्युएल' (flex fuel) आहेत, म्हणजे त्या कोणत्याही प्रकारच्या पेट्रोलवर चालू शकतात. मायलेजमधील घट भरून काढण्यासाठी सरकार अनुदान देतं आणि पंपावर कोणतं इंधन घ्यायचं हे ग्राहक ठरवतात. भारतात मात्र, वेगाला महत्त्व देताना ग्राहकांच्या निवडीचा विचार झाला नाही. देशातील ९०,००० हून अधिक पंपांना E20 सुरक्षितपणे साठवण्यासाठी टाक्यांची स्वच्छता आणि लायनिंग करणं गरजेचं आहे, पण यापैकी किती पंप खरंच तयार आहेत, याचं कोणतंही स्वतंत्र ऑडिट झालेलं नाही.
सरकारच्या मते, इथेनॉल मिश्रणामुळे मोठे फायदे झाले आहेत. कच्च्या तेलाच्या आयातीवर सुमारे २ लाख कोटी रुपयांची बचत झाली, पर्यावरणाला थोडा फायदा झाला आणि साखर कारखान्यांमार्फत शेतकऱ्यांच्या हातात पैसा पोहोचला. पण रेसिंग कारची उदाहरणं देऊन गाडीच्या इंजिनचं आयुष्य, रोजच्या वापरातील मायलेज आणि इंधन निवडीचं स्वातंत्र्य गमावल्याबद्दल वाहनचालकांच्या मनातल्या चिंता दूर होत नाहीत.