
घरात जर जुनी मातीची भांडी पडून असतील, तर ती फेकून देण्याऐवजी तुम्ही बाल्कनी सजवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. मातीचे छोटे माठ किंवा तसराळी वापरून तुम्ही कमी खर्चात रंगीबेरंगी फुलांनी बाल्कनीला एक रॉयल आणि सुंदर लूक देऊ शकता. यासाठी तुम्हाला पोर्टुलाका रोपटं किंवा त्याच्या कटिंग्जची गरज लागेल. पोर्टुलाकाला 'मॉस रोज' असंही म्हणतात. हे झाड कमी देखभालीत वेगाने वाढतं आणि उन्हाळ्यात भरपूर रंगीबेरंगी फुलं देतं. चला, जाणून घेऊया कमी खर्चात पोर्टुलाका फ्लॉवर टॉवर कसा बनवायचा.
वेगवेगळ्या आकाराची मातीची भांडी आधी स्वच्छ करून घ्या आणि तुमच्या आवडीच्या रंगाने ती रंगवा. तुम्ही हवं असल्यास त्यावर छान पेंटिंगसुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळ्या आकाराच्या मातीच्या तसराळ्या (पसरट भांडी) आणि एका माठाची गरज लागेल. रंग पूर्णपणे सुकल्यावर त्यात माती भरण्याचं काम सुरू करू शकता.
पोर्टुलाका फ्लॉवर टॉवर बनवण्यासाठी मातीची भांडी एकमेकांवर व्यवस्थित बसवणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी सगळ्यात खाली मोठी तसराळी ठेवा, त्याच्यावर मध्यम आकाराची आणि सगळ्यात वर छोटा माठ सेट करा. गरज वाटल्यास तुम्ही स्टँडचा वापरही करू शकता. त्यानंतर सगळ्या भांड्यांमध्ये खत मिश्रित माती भरा. आता प्रत्येक लेयरमध्ये पोर्टुलाकाची छोटी रोपं लावा. तुम्हाला नर्सरीमध्ये अशी रोपं सहज मिळतील. जर तुमच्याकडे मोठं रोपटं असेल, तर त्याच्या फांद्या तोडूनही तुम्ही या टॉवरमध्ये गोलाकार पद्धतीने लावू शकता.
बाल्कनीमध्ये जिथे तीन ते चार तास ऊन येतं, तिथेच हा फ्लॉवर टॉवर ठेवा. या रोपाला साधारण ३ ते ४ तास उन्हाची गरज असते. या झाडाला जास्त पाणी देण्याची गरज नाही; जेव्हा माती कोरडी दिसेल तेव्हाच पाणी द्या. जर तुम्ही जास्त पाणी दिलं, तर रोपांची मुळं खराब होऊ शकतात. बाल्कनीला एक पारंपरिक आणि युनिक लूक देण्यासाठी तुम्ही मातीच्या भांड्यांवर हाताने डिझाइनही काढू शकता. लहान घरं आणि अपार्टमेंटसाठी हा टॉवर खूप सुंदर दिसतो. यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न राहतं आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.