AI Content : सगळं खोटं, पण कमाई लाखात; AI फेक पोस्टमधून महिन्याला १६ लाख कमावतोय हा पठ्ठ्या

Published : Aug 14, 2026, 03:36 PM IST
AI Content : सगळं खोटं, पण कमाई लाखात; AI फेक पोस्टमधून महिन्याला १६ लाख कमावतोय हा पठ्ठ्या

सार

AI Content Earning : स्वतःला 'AI रेज बेटर' म्हणवणारा क्वॉन्टे डेवॉन प्रिंगल नावाचा एक डिजिटल क्रिएटर AI वापरून खोट्या कहाण्या आणि फोटो तयार करून महिन्याला १६ लाखांपेक्षा जास्त कमावत आहे. त्याने तयार केलेली एका मुलाची स्कर्ट घातलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती.

मिसिसिपी : एक डिजिटल क्रिएटर AI वापरून खोट्या स्टोरीज, फोटो पोस्ट करून महिन्याला तब्बल १६.२ लाख रुपये कमावत असल्याचा दावा करत आहे. हा तरुण स्वतःला 'AI रेज बेटर' (AI rage baiter) म्हणवतो. लोकांना मुद्दामहून डिवचणाऱ्या, भडकवणाऱ्या आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळवण्यासाठी पोस्ट टाकणाऱ्यांना 'रेज बेटर' म्हणतात. मिसिसिपीमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय क्वॉन्टे डेवॉन प्रिंगल नावाच्या या डिजिटल क्रिएटरने स्वतःच हा खुलासा केला आहे.

'सात वर्षांच्या मुलाने काय घालावं?'

अलीकडेच प्रिंगलने एका आईची खोटी कहाणी शेअर केली होती, ज्यात शाळा तिच्या मुलाच्या कपड्यांवर आक्षेप घेत असल्याचा आरोप होता. या पोस्टला ८२ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. या पोस्टमध्ये प्रिंगलने केविन नावाच्या ७ वर्षांच्या मुलाचा फोटो शेअर केला होता, ज्याने शाळेच्या युनिफॉर्मसोबत प्लीटेड स्कर्ट घातला होता. लोकांना हे खरं वाटावं म्हणून त्याने सोशल मीडियावर लिहिलं होतं, "मला हे पोस्ट करायचं नव्हतं, पण माझ्या मुलासोबत होणारा भेदभाव पाहून मी थकले आहे! माझ्या ७ वर्षांच्या मुलाने आज दुसऱ्या इयत्तेसाठी एका नवीन शाळेत जायला सुरुवात केली. आम्ही खूप आनंदी होतो, कारण आम्ही या शाळेबद्दल खूप चांगलं ऐकलं होतं. पण आमचा गैरसमज झाला. मला शाळेतून एक मेसेज आला की, त्याने अयोग्य कपडे घातले आहेत आणि त्याला ताबडतोब शाळेतून घरी घेऊन जा."

पोस्ट व्हायरल, जोरदार चर्चा, पण सगळंच खोटं!

ही पोस्ट आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यानंतर मुलांनी शाळेत जाताना कोणते कपडे घालावेत यावरून सोशल मीडियावर जोरदार वादविवाद सुरू झाले. पण गंमत म्हणजे, केविन नावाचा मुलगा, त्याची आई आणि ही संपूर्ण घटनाच खोटी होती. प्रिंगलने AI च्या मदतीने हे सर्व तयार केलं होतं. न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत प्रिंगलने सांगितलं की, 'साया वेलोर' नावाच्या बनावट फेसबुक आयडीवरून ही व्हायरल पोस्ट शेअर करण्यात आली होती आणि हे सगळं तयार करून पोस्ट करायला त्याला फक्त १० मिनिटं लागली.

खोट्या कहाण्यांमधून लाखोंची कमाई

प्रिंगल म्हणाला, "ज्या मुलाचं खरंतर अस्तित्वच नाही, त्याच्याबद्दलच्या एका कथेमुळे इंटरनेटवर एवढी मोठी चर्चा सुरू झाली, हे पाहून आश्चर्य वाटतं. AI टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे आणि सामान्य लोकांना खरं-खोटं ओळखणं किती कठीण झालं आहे, हे यातून स्पष्ट होतं." प्रिंगलच्या दाव्यानुसार, फक्त या एका पोस्टमधून त्याला सुमारे २.६ लाख रुपये (२,८०० डॉलर्स) मिळाले. तो फेसबुकवर पाच वेगवेगळी खाती चालवतो आणि त्यातून त्याला महिन्याला १७,००० डॉलर्सपर्यंत (सुमारे १६ लाख रुपये) उत्पन्न मिळतं. सोशल मीडियाद्वारे लोकांच्या भावनांशी खेळायला आवडतं, पण कोणालाही फसवण्याचा किंवा त्रास देण्याचा आपला हेतू नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कमाईच्या संधींचा गैरवापर करणारा प्रिंगल एकटाच नाही. गेल्या आठवड्यात, AI ने तयार केलेल्या बनावट पोस्ट्स वाढल्यामुळे 'X' (पूर्वीचे ट्विटर) ने आपला रेव्हेन्यू शेअर प्रोग्रॅम रद्द केला. याऐवजी, ओरिजिनल कंटेंट तयार करणाऱ्या क्रिएटर्ससाठी नवीन रिवॉर्ड प्रोग्राम आणणार असल्याचं एलॉन मस्कच्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मने जाहीर केलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

iQOO Neo 11 Ultra : 9100mAh बॅटरी, 50MP कॅमेरासह येतोय नवा फोन; फीचर्स एकदा बघाच
Car Offers : एक रुपयाही न देता घरी आणा १२ लाखांची SUV, कंपनीची जबरदस्त ऑफर