
शांघाय: चिनी शास्त्रज्ञांनी लवचिक आणि केसाच्या धाग्याएवढी पातळ फायबर चिप विकसित केली आहे. या शोधाबद्दल 'नेचर' या पीअर-रिव्ह्यूड जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. शांघायच्या फुदान विद्यापीठातील चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य पेंग हुइशेंग यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चिनी संशोधकांनी असे तंत्रज्ञान शोधले आहे, जे भविष्यात मोठ्या स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरची गरज संपवू शकते.
या क्रांतिकारी शोधाला "फायबर इंटिग्रेटेड सर्किट" (FIC) असे नाव देण्यात आले आहे. कॉम्प्युटर चिप्स सहसा न वाकणाऱ्या, जाड आणि चौकोनी प्लेट्सवर बनवल्या जातात. पण चिनी शास्त्रज्ञांनी हे नवीन सर्किट एका लवचिक बेसवर डिझाइन केले आहे, जे कोणत्याही प्रकारे वाकवले जाऊ शकते. ही फायबर चिप माणसाच्या केसासारखी पातळ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या धाग्याच्या केवळ एका सेंटीमीटरमध्ये 100,000 ट्रान्झिस्टर आहेत. याची प्रोसेसिंग पॉवर आधुनिक कॉम्प्युटरच्या CPU सारखीच असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
या तंत्रज्ञानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ताकद. अतिशय सूक्ष्म असूनही, ही लवचिक फायबर चिप्स अविश्वसनीयपणे मजबूत आहे. प्रयोगादरम्यान शास्त्रज्ञांनी तिला सुमारे 10,000 वेळा वाकवले. तरीही तिची कार्यक्षमता तशीच राहिली. याशिवाय, हा फायबर 30 टक्क्यांपर्यंत ताणला जाऊ शकतो आणि 180 अंशांपर्यंत फिरवला जाऊ शकतो. ही चिप 100 अंश सेल्सिअसपर्यंतची उष्णता सहन करू शकते. 15.6 टन वजनाचा कंटेनर ट्रकवरून गेल्यानंतरही ही चिप खराब न होता पूर्णपणे कार्यरत राहिली, असे संशोधकांनी म्हटले आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर केवळ कपड्यांपुरता मर्यादित नाही. शास्त्रज्ञ याला ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस (BCI) साठी एक महत्त्वाचा टप्पा मानत आहेत. हा धागा मऊ आणि लवचिक असल्यामुळे शरीरात मेडिकल इम्प्लांट म्हणून वापरणे सोपे होईल. कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीराच्या अवयवांवर लक्ष ठेवणे आणि त्यांना नियंत्रित करणे शक्य होईल.