
Car market : डिसेंबरमधील आकडेवारीनुसार गत 2025 वर्षात बड्या कार उत्पादक कंपन्यांची कामगिरी लक्षणीय ठरली. बहुतांश सर्वच कंपन्यांनी कार विक्रीत वाढ नोंदविली. यामुळे या ऑटोमोबाईल इंडस्ट्री नव्या वर्षातही सरस कामगिरी नोंदविण्यास सज्ज झाली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत काही बड्या कंपन्या आपली नवी मॉडेल्स लाँच करणार आहेत. विविध वैशष्ट्यांनी परिपूर्ण अशा या कार्सची वाहनप्रेमींना प्रतीक्षा आहे. या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सही आहे.
टाटा मोटर्सने नवीन पंच फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. ही एसयूव्ही भारत एनसीएपी (BNCAP) क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार सेफ्टी रेटिंगसह सादर करण्यात आली आहे. क्रॅश टेस्टमध्ये प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी या गाडीला ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, टाटा मोटर्सने नवीन पंचची एका ट्रकसोबत क्रॅश-टेस्ट केली. या चाचणीदरम्यान, चार डमी प्रवासी वापरण्यात आले. गाडीची ५० किमी प्रतितास वेगाने धडक झाली. धडकेनंतरही, गाडीची बॉडी सुरक्षित राहिली आणि अपघातानंतर चारही दरवाजे उघडले.
पंच फेसलिफ्टमध्ये टाटाने सुरक्षा वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या गाडीमध्ये सहा एअरबॅग्ज, ईएससी, एबीएस, टीपीएमएस, ३६०-डिग्री कॅमेरा आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स स्टँडर्ड म्हणून येतात. रेन-सेन्सिंग वायपर्स, ३६०-डिग्री सराउंड-व्ह्यू कॅमेरा, एलईडी ऑटो हेडलॅम्प्स आणि आयसोफिक्स चाईल्ड सीट माउंट्स यांसारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा यात समावेश आहे. यामुळे २०२६ मध्ये ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळवणारी पंच ही पहिली कार ठरू शकते.
नवीन पंचमध्ये टाटा मोटर्स अनेक पॉवरट्रेन पर्याय देणार आहे. यामध्ये नवीन १.२-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा समावेश आहे, जे ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे इंजिन १२० PS पॉवर आणि १७० Nm टॉर्क निर्माण करते. १.२-लिटर रेव्होट्रॉन नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनदेखील कायम राहील, जे ८८ PS पॉवर आणि ११५ Nm टॉर्क निर्माण करते. नवीन पंच ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्समध्ये उपलब्ध असेल. तसेच, यात १.२-लिटर रेव्होट्रॉन सीएनजीचा पर्यायही मिळेल, जो ७३.४ PS पॉवर आणि १०३ Nm टॉर्क निर्माण करतो आणि ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेला आहे.
नवीन टाटा पंचमध्ये सहज पार्किंगसाठी ३६०-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम, मोठी १०.२४-इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग आणि हार्मन ऑडिओ सिस्टम यांसारखी अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. नवीन टाटा पंच आता तिच्या सेगमेंटमध्ये सर्वात मोठी बूट स्पेस देते. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ३६६ लिटरची लगेज क्षमता आहे, तर सीएनजी व्हेरिएंटमध्ये २१० लिटरची वापरण्यायोग्य बूट स्पेस मिळते.