
Car market : भारतीय ऑटोमोबाइल इंडस्ट्री विस्तारत चालली आहे. 2025 या वर्षात बहुतांश सर्वच बड्या कार उत्पादक कंपन्यांच्या विविध मॉडेल्सची चांगली विक्री झाली. लोकांचाही कल एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक व्हेइकल खरेदी करण्याकडे दिसला. ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न या कंपन्यांचा आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा आरामदायी गाड्या उपलपब्ध करण्यात आल्या आहेत. यावर्षी नवनवीन मॉडेल्स लाँच होणार आहेत. यात स्कोडा सारख्या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे.
स्कोडा लवकरच फेसलिफ्टेड कुशाक सादर करणार आहे. अधिकृत लाँचपूर्वी, कंपनीने या अपडेटेड कॉम्पॅक्ट एसयूव्हीबद्दल अधिक माहिती देणारा एक नवीन टीझर रिलीज केला आहे. मागील टीझरमध्ये फक्त गाडीची बाह्यरेखा दाखवली होती, पण नवीन टीझर लायटिंग घटकांवर लक्ष केंद्रित करतो आणि फेसलिफ्टच्या डिझाइनची स्पष्ट कल्पना देतो.
यावेळी, स्टुडिओमध्ये टीझर शूट करण्याऐवजी स्कोडाने एक खास भारतीय टच निवडला आहे. टीझरमध्ये मोहरीच्या शेतात हिरव्या कपड्याने झाकलेली एसयूव्ही दिसते, जी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटाची आठवण करून देते. यासोबत 'प्रेमात पडायला तयार राहा' अशी टॅगलाईन आहे. यावरून स्पष्ट होते की, स्कोडाने केवळ अपडेटच नाही, तर कुशाकला एक खास ओळख देण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे.
हिरव्या रंगाच्या आवरणात असूनही, अनेक बाह्य बदल स्पष्टपणे दिसत आहेत. कुशाक फेसलिफ्टमध्ये समोरच्या बाजूला पूर्ण-रुंदीची LED DRL स्ट्रिप, तसेच अधिक शार्प LED लाईट्स असण्याची अपेक्षा आहे. पुन्हा डिझाइन केलेली ग्रिल अपेक्षित आहे, ज्यामुळे एसयूव्हीला अधिक आकर्षक आणि दमदार फ्रंट लूक मिळेल. मागील बाजूसही मोठे बदल अपेक्षित आहेत. टीझरमध्ये टेलगेटवर चमकणारा स्कोडा लोगो आणि कनेक्टेड LED लाईट बार दिसत आहे. ही वैशिष्ट्ये स्कोडाच्या नवीन ग्लोबल कार्ससारखी आहेत, ज्यामुळे कुशाकला रस्त्यावर एक प्रशस्त आणि प्रीमियम लूक मिळेल. कंपनीने अद्याप इंटीरियर उघड केले नसले तरी, फेसलिफ्टमध्ये केबिनमध्येही मोठे बदल अपेक्षित आहेत.
इंजिन बाबत मोठे बदल अपेक्षित नाहीत, परंतु काही सुधारणा शक्य आहेत. 1.5-लिटर TSI व्हेरियंटला मागील बाजूस डिस्क ब्रेक मिळू शकतात, ज्यामुळे ब्रेकिंग सुधारेल. याशिवाय, 1.0-लिटर आणि 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असलेल्या टॉप व्हेरियंटमध्ये अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन-कीप असिस्ट सारखे लेव्हल-2 ADAS फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. ट्रान्समिशनमध्ये एक मोठा बदल होऊ शकतो. प्राथमिक माहितीनुसार, 1.5-लिटर TSI इंजिन आता फक्त DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स बंद केला जाण्याची शक्यता आहे.