
Bedroom Plants: घरात झाडं लावली की फक्त घराला शोभाच येत नाही, तर वातावरणही एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह होतं. प्रत्येक खोलीची गरज आणि तिथे येणारा प्रकाश वेगवेगळा असतो, त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य झाड लावणं खूप महत्त्वाचं आहे. काही झाडं हवा शुद्ध करतात, तर काही दमटपणा टिकवून ठेवायला आणि आपला ताण कमी करायला मदत करतात. तुम्हालाही तुमचं घर सुंदर आणि हेल्दी बनवायचं असेल, तर जाणून घ्या कोणत्या खोलीसाठी कोणतं झाड बेस्ट मानलं जातं.
बेडरूममध्ये स्नेक प्लांट लावणं खूप फायदेशीर मानलं जातं. हे झाड रात्रीसुद्धा ऑक्सिजन सोडतं, ज्यामुळे झोप चांगली लागते आणि खोलीतली हवा शुद्ध राहते. याची खास गोष्ट म्हणजे याला जास्त ऊन किंवा पाण्याची गरज नसते. आठवड्यातून एकदा-दोनदा थोडं पाणी दिलं तरी चालतं. हे झाड खिडकीजवळ ठेवल्यास ते जास्त काळ हिरवंगार राहतं.
लिव्हिंग रूम किंवा हॉलची शोभा वाढवण्यासाठी अरेका पाम हा एक उत्तम पर्याय आहे. याची लांब हिरवी पानं घराला एक रॉयल आणि फ्रेश लूक देतात. हे हवेतील धूळ आणि विषारी घटक कमी करायला मदत करतं. या रोपाला हलक्या उन्हाची आणि नियमित पाण्याची गरज असते. फक्त माती जास्त ओली राहणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर मुळं खराब होऊ शकतात.
किचनमध्ये मनी प्लांट लावणं शुभ आणि उपयुक्त दोन्ही मानलं जातं. हे कमी जागेत सहज वाढतं आणि किचनला एक नॅचरल लूक देतं. याची वेल हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते आणि दमटपणाही टिकवून ठेवते. मनी प्लांट पाण्यात किंवा मातीत, दोन्हीमध्ये लावता येतो. याला थेट उन्हापासून दूर ठेवा आणि वेळोवेळी पाणी बदलत राहा.
बाथरूममध्ये दमटपणा जास्त असतो, त्यामुळे तिथे पीस लिलीसारखी झाडं चांगली वाढतात. हे झाड हवेतील दुर्गंध आणि विषारी घटक कमी करायला मदत करतं. याची पांढरी फुलं बाथरूमला एक एलिगंट लूक देतात. याला जास्त उन्हाची गरज नसते, त्यामुळे कमी प्रकाशातही हे झाड सहज वाढतं. माती हलकी ओलसर ठेवा आणि सुकलेली पानं वेळच्या वेळी काढून टाका.
बाल्कनीमध्ये तुळस आणि कोरफड (एलोवेरा) लावणं सर्वात फायदेशीर मानलं जातं. तुळस वातावरण शुद्ध करते, तर कोरफड औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. दोन्ही रोपांना चांगल्या उन्हाची गरज असते, म्हणून त्यांना मोकळ्या जागेत ठेवा. रोज थोडं पाणी देणं आणि सुकलेली पानं काढल्यामुळे ही रोपं चांगली वाढतात. यामुळे बाल्कनीला एक ग्रीन आणि फ्रेश लूकही मिळतो.