‘सोशल मीडियामुळे मुलांना होणार्या धोक्यांमुळे १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यात येईल आणि या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असेल,’ असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले.
मेलबर्न: १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मज्जाव करण्याचा विचार ऑस्ट्रेलिया सरकार करत आहे. ‘सोशल मीडियामुळे मुलांना होणार्या धोक्यांमुळे १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यात येईल आणि या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असेल,’ असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले.
‘यासंदर्भातील विधेयक चालू अधिवेशनाच्या शेवटच्या दोन आठवड्यांत मांडले जाईल आणि ते मंजूर झाल्यावर एका वर्षानंतर ते लागू होईल. या कालावधीत एक्स, टिकटॉक, इन्स्टाग्राम, फेसबुक यांनी १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचे मार्ग शोधावेत,’ असे अल्बानीज यांनी सुचवले. मात्र, शैक्षणिक हेतूंसाठी वापर यातून वगळण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मेटाचे सुरक्षा प्रमुख याला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने निश्चित केलेल्या वयोमर्यादेचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.
याशिवाय, पालकांनी त्यांच्या मुलांनी वापरत असलेल्या अॅप्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी अॅप स्टोअर आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये उपलब्ध असलेली सोपी आणि प्रभावी साधने वापरावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. मात्र, एक्स आणि टिकटॉककडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सरकारच्या या निर्णयाला विरोध करत यंग मेंटल हेल्थ सर्व्हिस रिचआउटच्या संचालका म्हणाल्या की, मुले स्वाभाविकपणे बंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करतील आणि अडचणीत येतील.