
8th Pay Commission Update : आठव्या केंद्रीय वेतन आयोगाबाबतची अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टरच्या आधारे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.
केंद्र सरकारी कर्मचारी आतुरतेने वाट पाहत असलेल्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाबाबतची अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२५ मध्ये आयोगाला केंद्राने तत्वतः मान्यता दिली असली तरी, आयोगाच्या स्थापनेची घोषणा लवकरच अपेक्षित असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. सध्या राज्य सरकारांशी सक्रिय चर्चा सुरू आहे. आठव्या वेतन आयोगाची अधिकृत अधिसूचना योग्य वेळी जारी केली जाईल, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतेच राज्यसभेत बोलताना स्पष्ट केले. अधिसूचना आल्यानंतरच आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे पगार आणि पेन्शन ठरवण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा निकष म्हणजे फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor). किमान जीवनखर्चाच्या आधारावर योग्य पगार मोजण्यासाठी डॉ. वॉलेस आयक्रॉयड यांनी विकसित केलेला आयक्रॉयड फॉर्म्युला स्वीकारण्याचा केंद्र सरकार विचार करू शकते. हा फॉर्म्युला अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या अत्यावश्यक खर्चांचा विचार करून एका सामान्य कामगाराच्या पौष्टिक गरजांवर लक्ष केंद्रित करतो.
सध्या महागाई भत्ता ५८ टक्के आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर डीए ६० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ६० टक्के डीए विचारात घेतल्यास, मूळ फिटमेंट फॅक्टर १.६० असेल. यात १० ते ३० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त वाढ मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, २० टक्के वाढ दिल्यास फिटमेंट फॅक्टर १.९२ होईल. ३० टक्के वाढ दिल्यास फिटमेंट फॅक्टर २.०८ पर्यंत वाढेल. सुधारित पगार = मूळ पगार × फिटमेंट फॅक्टर या मूलभूत सूत्राचा वापर करून नवीन पगार मोजला जाईल.
सध्या सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपये आणि पेन्शनधारकांची किमान मूळ पेन्शन ९,००० रुपये आहे. याशिवाय ५८ टक्के डीए/डीआर मिळतो. आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर डीए/डीआर शून्यावर आणला जाईल. जर फिटमेंट फॅक्टर १.९२ झाला, तर कर्मचाऱ्यांचे नवीन किमान मूळ वेतन ३४,५६० रुपये आणि पेन्शनधारकांची किमान मूळ पेन्शन १७,२८० रुपये होईल.
जर फिटमेंट फॅक्टर २.०८ झाला, तर कर्मचाऱ्यांचे नवीन किमान मूळ वेतन ३७,४४० रुपये आणि पेन्शनधारकांची किमान मूळ पेन्शन १८,७२० रुपये होईल. एक कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक त्यांच्या पगार/पेन्शन वाढीवर परिणाम करणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेची आतुरतेने वाट पाहत आहेत.