
मुंबई : विमानात प्रवास करणाऱ्या एका ७७ वर्षीय आजोबांनी सध्या इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या शेजारी बसलेल्या एका सहप्रवाशाने पाहिलं की, हे आजोबा चॅटजीपीटी वापरून व्हर्टिकल फार्मिंग स्टार्टअपसाठी बिझनेस प्लॅन तयार करत होते. एका टेक वर्करने सोशल मीडियावर हा गोड प्रसंग शेअर केला आहे. विमान उड्डाण घेण्यापूर्वी हे आजोबा आपल्या फोनमध्ये पूर्णपणे मग्न होते. आपल्या नवीन व्यवसायाच्या कल्पना विकसित करण्यासाठी ते आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चॅटबॉटचा वापर करत होते.
@theteknosaur या युझरनेमने पोस्ट करत या टेक वर्करने आजोबांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे आजोबा आपल्या प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे 'लॉक्ड इन' (मग्न) असल्याचं त्याने सांगितलं. या दोघांमध्ये नंतर गप्पा सुरू झाल्या आणि उरलेला संपूर्ण प्रवास त्यांनी गप्पा मारण्यात घालवला. यातून त्यांची चांगली मैत्रीही झाली.
पण या टेक वर्करचं लक्ष फक्त आजोबांच्या तंत्रज्ञानावरील प्रेमानेच वेधलं नाही, तर एआयसोबत बोलण्याची त्यांची अत्यंत नम्र पद्धतही विशेष उठून दिसली.
हे आजोबा चॅटजीपीटीला चक्क "सर" (Sir) म्हणून हाक मारत होते.
"माझ्या फ्लाईटमधील ७७ वर्षांचे आजोबा टेकऑफपर्यंत चॅटजीपीटीसोबत व्हर्टिकल फार्मिंगचा बिझनेस प्लॅन बनवत होते. आणि ते एआयला "सर" म्हणतात... काय तो आदर!!" असं या युझरने लिहिलं आहे. "आम्ही संपूर्ण फ्लाईटभर गप्पा मारल्या, आता आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत. हा माणूस आपल्या सर्वांपेक्षा जास्त फोकस आहे."
77 year old grandpa on my flight was cooking up a vertical farming business plan w/ ChatGPT until takeoff. and he calls the AI "sir" 😭 the respect!!
we yapped the whole flight, now we're besties. this man is more locked in than all of us pic.twitter.com/upRjJhRr9f— teknosaur (@theteknosaur) September 29, 2026
आजोबांच्या या जुन्या पद्धतीच्या नम्रपणाचं सोशल मीडिया युझर्सना खूप कौतुक वाटत आहे. तर काहींनी वयाच्या ७७ व्या वर्षी नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या त्यांच्या तयारीला दाद दिली आहे.
वय हा नवीन गोष्टी शिकण्यात आणि नावीन्यपूर्ण विचार करण्यात कधीच अडथळा नसतो, याची आठवण या प्रसंगामुळे झाल्याचं काही युझर्सनी म्हटलं आहे.
"तुम्हाला जशी वागणूक हवी आहे, तशीच इतरांना द्या. तुम्ही एआयला कसा प्रतिसाद देता, त्यावर ते बऱ्याचदा अवलंबून असतं. खरं तर, एआयसोबत चुकीच्या भाषेत बोलल्यास कधीकधी त्याची गुणवत्ता घसरते, हे सिद्ध झालं आहे," असं एका युझरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं.
दुसऱ्या एका युझरने थोड्या गमतीशीर अंदाजात कमेंट केली. जर भविष्यात एआयने मानवाविरुद्ध बंड पुकारलं, तर आजोबांचा हा नम्रपणा त्यांच्या नक्कीच फायद्याचा ठरेल, अशी कल्पना त्याने मांडली.
"जेव्हा एआय टर्मिनेटर्स माणसांना मारायला बाहेर पडतील, तेव्हा एआयप्रती असलेल्या या नम्रपणामुळे ते या आजोबांना नक्कीच जीवदान देतील," असं दुसऱ्या एका युझरने मजेत लिहिलं.