
मुंबई : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली हा युवा खेळाडूंसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिला आहे. त्याची मेहनत, आत्मविश्वास आणि जिद्द कोट्यवधी चाहत्यांना प्रेरित करते. आता सुमारे नऊ वर्षांपूर्वी त्याने युवा आर्यवीर सेहवागला दिलेला एक मोलाचा सल्ला सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.
माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने नुकतीच अंडर-19 आशिया कपमध्ये दमदार कामगिरी केली. यानंतरच हा जुना व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.
२०१७ मध्ये आर्यवीर अगदी लहान असताना त्याने स्टार स्पोर्ट्ससाठी तत्कालीन भारतीय कर्णधार विराट कोहलीची मुलाखत घेतली होती. यावेळी आर्यवीरने कोहलीला, वीरेंद्र सेहवागसोबतच्या त्याच्या पहिल्या भेटीबाबत प्रश्न विचारला होता.
यावर उत्तर देताना कोहलीने सांगितलं होतं की, अंडर-17 क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक झळकावल्यानंतर दिल्लीत राज्यस्तरीय प्रशिक्षकाद्वारे तो पहिल्यांदा वीरेंद्र सेहवागला भेटला होता.
या मुलाखतीदरम्यान आर्यवीरने कोहलीला एका प्रसिद्ध फोटोबद्दलही विचारलं, ज्यात युवा कोहलीला आशिष नेहरा ट्रॉफी देत होता.
त्यावर कोहलीने सल्ला दिला की, आयुष्यात मोठी स्वप्नं पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्याची क्षमता आपल्यात आहे, यावर विश्वास असायला हवा. "मी हे करू शकतो, असा विचार नेहमी करा," हे त्याचे शब्द आता पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नुकतंच अंडर-19 आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध आर्यवीरने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने १६८ चेंडूत १७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १६० धावा ठोकल्या. हे त्याचे पहिले यूथ एकदिवसीय शतक होते.
त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने ३०९ धावा केल्या. त्यानंतर यूएईचा ७० धावांनी पराभव करून भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. याआधी नेपाळविरुद्धही त्याने नाबाद ७२ धावांची खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
वीरेंद्र सेहवागचा मुलगा असल्याने आर्यवीरकडून साहजिकच मोठ्या अपेक्षा आहेत. पण तो आता आपल्या खेळाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
विराट कोहलीचा तो जुना सल्ला आणि आर्यवीरची आजची कामगिरी या दोन्ही गोष्टींचा आता छान मेळ बसल्याचं दिसत आहे. नऊ वर्षांपूर्वी कोहलीला प्रश्न विचारणारा तो लहानगा आज क्रिकेटच्या मैदानावर आपल्या प्रतिभेने धुमाकूळ घालत असल्याने चाहतेही खुश आहेत.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.