
मुंबई : गेल्या दीड महिन्यात अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. काहींनी एकाच प्रकारातून निवृत्ती घेतली असून, तर काहींनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यामध्ये भारतीय स्टार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. ही यादी पाहिल्यास..
७ मे २०२५ रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे 'हिटमॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने ६७ कसोटीत ४३०१ धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतके आणि १८ अर्धशतके आहेत. कसोटी कर्णधार म्हणून त्याची फलंदाजी चाहत्यांना आवडली.
१२ मे रोजी विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. १२३ कसोटीत त्याने ९२३० धावा केल्या आहेत. त्याच्या कसोटी कारकिर्दीत विराट कोहलीने ७ द्विशतके आणि ३० शतके झळकावली. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केलेल्या विराटने जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला.
२ जून रोजी ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. १४९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३९९० धावा करणाऱ्या मॅक्सवेलने टी२० क्रिकेट सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. २०२३ विश्वचषकातील त्याची २०१* धावांची खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे.
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्रीच क्लासेनने ३३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने ४ कसोटी, ६० एकदिवसीय आणि ५८ टी२० सामने खेळले. आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून १४ सामन्यांमध्ये त्याने ४८७ धावा केल्या.
वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनने २९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. १०६ टी२० आणि ६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ४००० हून अधिक धावा केल्या. आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून त्याने धावांचा पाऊस पाडला.
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने २३ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. १७ जूनपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेतील पहिला कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. २००९ मध्ये कसोटी पदार्पण केलेल्या मॅथ्यूजची १७ वर्षांची कारकीर्द बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने संपुष्टात येईल.
भारतीय लेग स्पिनर पियुष चावलाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३ कसोटी, २५ एकदिवसीय आणि ७ टी२० सामन्यांमध्ये त्याने ४३ बळी घेतले. चावला २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
गुजरातचा सलामीवीर प्रियांंक पांचालने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. १२७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ८८५६ धावा केल्या. २०१६ मध्ये ३१४* धावा करून तो गुजरातकडून तिप्पट शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला.