
रियान पराग ६ चेंडूत ६ षटकार: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात रियान परागने असा धुमाकूळ घातला की, जग हैराण झाले. आयपीएल २०२५ च्या ५३ व्या सामन्यात त्याने ६ चेंडूत सलग ६ षटकार मारले. मात्र, त्याने एकाच गोलंदाजाच्या षटकात सलग ६ षटकार मारले नाहीत. पहिले मोईन अलीच्या षटकात त्याने सलग ५ षटकार मारले, त्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या पहिल्याच चेंडूवर सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. अशाप्रकारे त्याने ६ चेंडूत ३६ धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याच्या या स्फोटक फलंदाजी असूनही राजस्थान हा सामना १ धावेने हरला.
२०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकेकाळी राजस्थान रॉयल्स बिकट परिस्थितीत दिसत होती. ७१ धावांवर संघाचे पाच फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर रियान परागने १३ व्या षटकात मोईन अलीच्या पहिल्या चेंडूवर सिमरन हेटमायरने खेळला आणि एक धाव घेतली. त्यानंतर पुढील सलग पाच चेंडूंवर पाच षटकार ठोकले. नंतर १४ वे षटक घेऊन आलेल्या वरुण चक्रवर्तीच्या पहिल्याच चेंडूवर त्याने मोठा षटकार मारला आणि अशाप्रकारे ६ चेंडूत ६ षटकार मारण्याचा विक्रम केला.
एका षटकात सलग पाच चेंडूंवर पाच षटकार मारणारा रियान पराग आता दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. त्याच्या आधी एकूण ४ दिग्गज फलंदाजांनी हे कर्तृत्व गाजवले आहे. रियानपूर्वी रवींद्र जाडेजा, राहुल तेवतिया, ख्रिस गेल आणि रिंकू सिंग यांचे नाव येते, ज्यांनी ५ चेंडूंवर सलग ५ षटकार एकाच गोलंदाजाला मारले होते.
KKR समोर रियान परागने स्फोटक फलंदाजी केली. त्याने ४५ चेंडूत ९५ धावांची तुफानी खेळी केली, ज्यात ६ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. मात्र, आणखी एक षटकार मारण्याच्या नादात तो बाद झाला आणि शतकापासून चुकला. मात्र, त्यानंतर सामनाही खूपच रोमांचक झाला. ज्यात राजस्थान रॉयल्सला १ धावेने पराभव पत्करावा लागला. या हंगामातील त्याचे हे सर्वोत्तम वैयक्तिक स्कोअर आहे.