
राजकोट : बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीतील रिक्त पदासाठी सोशल मीडियावर अर्ज मागवले आहेत. या पोस्टवर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने एक भन्नाट कमेंट केलीये. अजित आगरकरने चीफ सिलेक्टर पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच जडेजाची ही कमेंट आल्याने चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झालीये.
बीसीसीआयने एक्स (X) वर सिलेक्टर पदासाठी अर्ज मागवणारी एक पोस्ट केली होती. यावर जडेजाने "अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? 🤣" अशी कमेंट केली. जडेजा सहसा सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह नसतो आणि दुसऱ्यांच्या पोस्टवर तर तो क्वचितच रिप्लाय देतो. त्यामुळे त्याची ही मजेत केलेली कमेंट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालीये.
@BCCI What the procedure?🤣
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) October 7, 2026
अजित आगरकर आणि जडेजा यांच्यात कधीही उघडपणे वाद झाले नाहीत. पण आगरकर चीफ सिलेक्टर असताना त्याने टी-२० आणि एकदिवसीय संघात युवा खेळाडूंना जास्त संधी दिली. २०२४ मध्ये भारताने टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसोबत जडेजानेही टी-२० मधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आगरकरच्या निवड समितीने २०२४ च्या श्रीलंका दौऱ्यातून आणि २०२५ च्या ऑस्ट्रेलिया मालिकेतील एकदिवसीय संघातून जडेजाला डच्चू दिला होता.
जडेजा अजूनही टीमच्या प्लॅनिंगचा भाग असल्याचं आगरकरने स्पष्ट केलं होतं. पण टीम मॅनेजमेंट आणि सिलेक्टर्सच्या निर्णयावर आपण नाराज असल्याचं जडेजाने आधीच्या काही मुलाखतींमध्ये बोलून दाखवलं होतं. आता आगरकरच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयच्या पोस्टवर जडेजाने हसणाऱ्या इमोजीसह दिलेला रिप्लाय म्हणजे निवड समितीवर काढलेला राग असल्याचं क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहत्यांचं म्हणणं आहे.
बीसीसीआयच्या सध्याच्या नियमांनुसार, कोणताही सक्रिय क्रिकेटपटू प्रशासकीय किंवा निवड समितीत कोणतंही पद भूषवू शकत नाही. चीफ सिलेक्टर पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती क्रिकेटमधून निवृत्त होऊन किमान पाच वर्षे पूर्ण झालेली असावी, असा नियम आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.