
IPL 2026: मैदानावर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार, विकेट्सची पडझड आणि विजयासाठी झालेली चढाओढ... राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. राजस्थानने दिलेल्या २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची दमछाक झाली आणि अवघ्या ६ धावांनी राजस्थानने बाजी मारली.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने धावफलकावर २१० धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये ध्रुव जुरेलने ७५ धावांची झंझावाती खेळी केली. त्याला यशस्वी जयस्वाल (५५ धावा) आणि युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी (३१ धावा) यांनी मोलाची साथ दिली. या त्रिकुटाच्या बळावर राजस्थानने २० षटकांत ६ गडी गमावून भक्कम धावसंख्या उभारली.
२११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. साई सुदर्शनने ४४ चेंडूंत ७३ धावा कुटत राजस्थानच्या गोटात घबराट निर्माण केली होती. मात्र, खरा खेळ सुरू झाला जेव्हा रवी बिश्नोई गोलंदाजीला आला.
बिश्नोईचा 'मॅजिक स्पेल': बिश्नोईने एकामागून एक धक्के देत साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स आणि वॉशिंग्टन सुंदरला तंबूत धाडले.
पहिले ४ बळी: राहुल तेवतियाची विकेट घेत बिश्नोईने आयपीएल कारकिर्दीतील आपली पहिली 'फोर विकेट हॉल' (४ बळी) साजरी केली.
दुसरीकडे, नांदे बर्गरने धोकादायक जोस बटलरला २६ धावांवर बाद करून गुजरातच्या अडचणीत भर घातली.
सामना शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक वळणावर होता. रशीद खान आणि कागिसो रबाडा मैदानात असल्याने गुजरातला विजयाची आशा होती. शेवटच्या ६ चेंडूंमध्ये ११ धावांची गरज होती.
कर्णधाराने चेंडू तुषार देशपांडेच्या हातात सोपवला. दडपणाच्या या क्षणी देशपांडेने कमालीची अचूकता दाखवली. त्याने संपूर्ण षटकात फक्त ४ धावा खर्च केल्या. ४ विकेट घेणारा बिश्नोई विजयाचा शिल्पकार ठरला असला, तरी शेवटच्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करणारा तुषार देशपांडे खऱ्या अर्थाने 'मॅच विनर' ठरला.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.