
ख्राईस्टचर्च : मोक्याच्या क्षणी मारलेले चुकीचे शॉट्स आणि खराब निर्णयांचा ऋषभ पंत आणि भारतीय संघाला अनेकदा फटका बसला आहे, असे स्पष्ट मत माजी भारतीय क्रिकेटपटू आर. अश्विनने मांडले आहे. न्यूझीलंड विरुद्ध ख्राईस्टचर्च कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मोठा शॉट मारण्याच्या नादात पंत आऊट झाला, त्यानंतर अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवरून पंतवर सडकून टीका केली. दुसऱ्या दिवशी जेकब डफीच्या गोलंदाजीवर क्रीज सोडून षटकार मारण्याचा प्रयत्न करताना पंत २३ धावांवर काईल जेमिसनकडे झेल देऊन बाद झाला. पंत मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने भारतीय संघाची मोठी पडझड झाली.
अश्विनने स्पष्ट केले की, जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडू बनण्याची क्षमता असूनही, परिस्थितीनुसार खेळ न करता आल्याने पंतला त्याच्या करिअरमध्ये अनेकदा मागे राहावे लागले आहे. आपल्या पिढीतील एक उत्कृष्ट खेळाडू बनण्याची पंतमध्ये क्षमता आहे. पण जर त्याने आपला खेळ आणखी सुधारला असता आणि चांगले निर्णय घेतले असते, तर कसोटीत भारताच्या चौथ्या क्रमांकावर तो पक्का झाला असता आणि कदाचित संघाचा कर्णधारही बनू शकला असता. पण पंतची आक्रमक फलंदाजीची शैली भारताला किती सामन्यांमध्ये विजय मिळवून देते, हेही पाहणे गरजेचे आहे, असे अश्विन म्हणाला.
पंतच्या कारकिर्दीतील नऊ कसोटी शतकांपैकी फक्त दोन शतकांनी संघाला विजय मिळवून दिला आहे, असेही अश्विनने नमूद केले. गाबामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८९ धावांची खेळी विजयी कसोटी डाव म्हणून मानली जाऊ शकते, पण मोठ्या खेळी आणि विजयातील अंतर लक्षवेधी असल्याचे अश्विनने सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंत ज्या पद्धतीने बाद झाला होता, त्याचीही आठवण अश्विनने करून दिली. आक्रमक खेळून आऊट होणे म्हणजे निःस्वार्थ क्रिकेट मानले जाऊ शकत नाही, असे अश्विनने थेट सुनावले. ९० धावांवर आऊट झाल्याने खेळी निःस्वार्थ ठरत नाही. कधी कधी ते फक्त निष्काळजीपणा आणि मूर्खपणाच असतो, असेही अश्विनने ठणकावून सांगितले.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.