
मुंबई : विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकून आता वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. पण त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावर अजूनही चर्चा सुरूच आहे. आता भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने केलेल्या दाव्यामुळे या चर्चेला एक नवं वळण लागलं आहे. टेस्ट करिअरच्या शेवटच्या टप्प्यात कोहलीला संघातल्या काहींकडून पूर्वीसारखं महत्त्व आणि पाठिंबा मिळत नसल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली असावी, असं कैफने म्हटलं आहे.
मोहम्मद कैफच्या मते, निवृत्तीबद्दलच्या मुलाखतींमध्ये कोहली थोडा निराश दिसत होता. फॉर्म खराब असला तरी कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूला जास्त पाठिंबा द्यायला हवा होता, असं कैफचं स्पष्ट मत आहे.
संघातल्या लोकांचा आपल्यावरचा विश्वास कमी झालाय, असं कोहलीला वाटलं असावं. अर्थात, कोहलीने स्वतः हे कधीच उघडपणे बोलून दाखवलं नाही. पण कोहलीचं वागणं आणि त्यावेळची परिस्थिती पाहून कैफने हे स्वतःचं विश्लेषण मांडलं आहे.
टेस्ट क्रिकेटच्या शेवटच्या काळात कोहलीला रन्ससाठी खूप संघर्ष करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्येही त्याच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण कैफच्या मते, कोहलीचे जुने कमबॅक पाहिले तर त्याच्यात पुन्हा फॉर्ममध्ये येण्याची पूर्ण ताकद होती.
एखाद्या अनुभवी खेळाडूची तुलना नवीन खेळाडूशी करू नये, असं कैफचं म्हणणं आहे. कोणत्याही खेळाडूचा फॉर्म कधी ना कधी खराब होऊ शकतो. पण कोहलीने याआधीही कठीण प्रसंगातून बाहेर पडून दमदार कामगिरी केली आहे, याची आठवण कैफने करून दिली.
कैफच्या या दाव्याला आणखी एक कारण म्हणजे कोहलीची वनडेमधली कामगिरी. टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कोहलीने वनडेमध्ये आपली दमदार कामगिरी सुरूच ठेवली. यामुळेच, जर त्याला टेस्टमध्ये थोडा आणखी वेळ दिला असता, तर त्याने नक्कीच कमबॅक केलं असतं, हा कैफचा विश्वास अधिक पक्का झाला आहे.
मोहम्मद कैफच्या मते, कोहलीसारखा सीनियर खेळाडू संघात असणं युवा कर्णधार शुभमन गिलसाठीही फायद्याचं ठरू शकतं. अनुभव, दबावाच्या वेळी निर्णय घेण्याची क्षमता आणि मोठ्या मॅचेसचा अनुभव संघाच्या नेहमीच कामी येतो, असं त्याला वाटतं.
थोडक्यात सांगायचं तर, 'पाठिंब्याचा अभाव' हेच विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीचं नेमकं कारण आहे, असं ठामपणे सांगता येणार नाही. पण कोहलीच्या निवृत्तीबद्दल कैफने मांडलेल्या या विश्लेषणामुळे त्याच्या टेस्ट करिअरच्या शेवटच्या टप्प्याबद्दल आता एक नवी चर्चा सुरू झाली आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.