
मुंबई : आयपीएल २०२७ च्या रिटेंशन आणि रिलीजची डेडलाईन १७ नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी संपत आहे. १६ डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी सर्व १० फ्रँचायझी आपापले संघ फायनल करत आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मूळ डेडलाईन १५ नोव्हेंबरवरून दोन दिवसांनी वाढवली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ व्या एकदिवसीय सामन्याशी क्लॅश होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. हा सामना भारताने २२ धावांनी जिंकला आणि मालिका ३-१ ने खिशात घातली.
रिटेंशनपूर्वी फ्रँचायझींनी आपापले संघ मजबूत करण्यासाठी काही मोठे प्री-ऑक्शन ट्रेड केले. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सने हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांची १८ कोटी रुपयांना अदलाबदल केली. हार्दिक आता पंजाबकडून खेळणार असून, अर्शदीप मुंबईत दाखल झाला आहे.
ऋषभ पंतने लखनौ सुपर जायंट्समधून दिल्ली कॅपिटल्समध्ये पुनरागमन केले आहे. त्याची फी २७ कोटींवरून १५ कोटी करण्यात आली आहे. तर कुलदीप यादव १३.५० कोटी रुपयांच्या किमतीवर लखनौमध्ये गेला आहे. चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसोबत चार खेळाडूंचा ट्रेड पूर्ण केला. यात लियाम लिव्हिंगस्टोन (६ कोटी) आणि जॅक एडवर्ड्स (३ कोटी) चेन्नईत आले, तर खलील अहमद (४.८ कोटी) आणि नॅथन एलिस (२ कोटी) हैदराबादकडे गेले.
आयपीएल २०२७ च्या रिटेंशनची डेडलाईन जवळ येताच, सर्वांचे लक्ष चेन्नई सुपर किंग्सच्या एमएस धोनीकडे लागले आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत यादी सबमिट करायची आहे. इतर संघांप्रमाणेच चेन्नईनेही आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची कोणतीही माहिती दिलेली नाही.
४५ वर्षीय धोनीचे भवितव्य आणि तो आणखी एक हंगाम खेळणार का, हा सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. २०२६ च्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे धोनीला खेळता आले नव्हते. त्यामुळे २०२७ च्या हंगामात तो खेळणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२०२६ च्या आयपीएलमध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग्सच्या सराव सत्रांमध्ये सहभाग नोंदवला होता, पण तो संघासोबत सामन्यांसाठी गेला नाही. १८ मे रोजी झालेल्या चेन्नईच्या शेवटच्या घरच्या सामन्यात त्याने चेपॉक स्टेडियमवर हजेरी लावली होती.
🚨 NO MS DHONI IN IPL 2027 💔
- MS Dhoni is unlikely to feature in playing XI of CSK in IPL 2027. (Nitin Srivastav/Sports Tak). https://t.co/KFM4AqUYOz
— Tanuj (@ImTanujSingh) November 16, 2026
धोनीने २०२५ च्या आयपीएलमध्ये शेवटचा सामना खेळला होता. ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्यानंतर त्याने चेन्नईचे कर्णधारपद स्वीकारले होते.
२०२६ च्या हंगामात धोनीला दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल मुकावे लागले. त्याने चेन्नईच्या १४ पैकी एकाही सामन्यात भाग घेतला नाही.
चेन्नई सुपर किंग्ससमोर एमएस धोनीला २०२७ च्या आयपीएलसाठी रिटेन करायचे की नाही, असा मोठा प्रश्न आहे. गेल्या दोन आयपीएल हंगामांमध्ये बीसीसीआयच्या अनकॅप्ड प्लेअरच्या नियमानुसार धोनीला ४ कोटी रुपयांना रिटेन करण्यात आले होते.
मात्र, धोनी यावर्षी जुलैमध्ये ४५ वर्षांचा झाला आहे. चेन्नईचा निर्णय त्याच्या फिटनेसवर आणि त्याच्या खेळण्याच्या इच्छेवर अवलंबून असेल. फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी स्पष्ट केले आहे की हा निर्णय पूर्णपणे धोनीचा असेल.
पीटीआयशी बोलताना चेन्नईचे सीईओ म्हणाले, "धोनीने अजूनही खेळणार नाही असे म्हटलेले नाही. त्यामुळे आपण वाट पाहूया." धोनीचा खेळाडू, प्रशिक्षक किंवा मेंटॉर म्हणूनही फ्रँचायझी स्वीकार करेल, असेही ते म्हणाले.
संध्याकाळी ६ वाजेपर्यंत यादी सबमिट झाल्यावरच धोनीचा निर्णय अधिकृतपणे कळेल. जर धोनीला चेन्नईने रिटेन केले, तर अनकॅप्ड प्लेअरच्या नियमानुसार त्याला ४ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत तरी धोनीला चेन्नई २०२७ च्या आयपीएलसाठी संघात कायम ठेवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, पण तो खेळणार की नाही याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.