न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटी सामन्यात पराभव झाल्याने भारतीय संघाने एक अत्यंत वाईट विक्रम आपल्या नावावर केला आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत येथे वाचा.
मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टॉम लाथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने ३-० असा विजय मिळवत इतिहास रचला आहे. मुंबई कसोटी सामन्यापूर्वीच पहिले दोन सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केलेल्या किवी संघाने, आता वानखेडे येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात २५ धावांनी रोमांचक विजय मिळवत भारताचा व्हाइटवॉश केला आहे.
यासोबतच न्यूझीलंड संघाने आशियाई उपखंडात प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये क्लीनस्वीप केला आहे. ऋषभ पंत फलंदाजी करत असताना विजय अनिश्चित होता. मात्र पंत बाद झाल्यानंतर भारतीय संघ पराभवाकडे वाटचाल करू लागला.
भारतीय संघाने १९३३-३४ मध्ये प्रथमच घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. ब्रिटिश काळात झालेल्या या मालिकेत भारताचा २-० असा पराभव झाला होता. स्वातंत्र्यानंतर घरच्या मैदानावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला प्रथमच ३-० असा व्हाइटवॉश झाला आहे.
मुंबई कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला केवळ २३५ धावांवर रोखण्यात भारतीय संघ यशस्वी झाला होता. त्यानंतर भारताने पहिल्या डावात २६३ धावा काढत २८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात जडेजा आणि अश्विनच्या घातक गोलंदाजीपुढे न्यूझीलंड संघ १७४ धावांवर सर्वबाद झाला. यामुळे भारतासमोर विजयासाठी केवळ १४७ धावांचे सोपे लक्ष्य होते. एजाज पटेल आणि ग्लेन फिलिप्सच्या फिरकी गोलंदाजीपुढे भारतीय संघ १२१ धावांवर सर्वबाद झाला आणि किवी संघाकडून तिसऱ्या कसोटीतही पराभव पत्करावा लागला.