
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर आज क्रिकेटचा असा थरार पाहायला मिळाला ज्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता! टी-२० वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारताने गतविजेत्या इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. या विजयासह टीम इंडियाने केवळ इंग्लंडचे पॅकअप केले नाही, तर आपणच 'बॉस' असल्याचे सिद्ध केले.
टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी २५४ धावांचे अजस्त्र लक्ष्य ठेवले होते. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर फिल सॉल्ट लवकर तंबूत परतला, तर कर्णधार हॅरी ब्रूकही अवघ्या ७ धावांवर बाद झाला. जॉस बटलर (२५) आणि टॉम बँटन (१७) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ते टिकू शकले नाहीत.
इंग्लंडचे गडी एकामागून एक बाद होत असताना जेकॉब बेथेल भारताच्या विजयामध्ये भिंतीसारखा उभा राहिला. त्याने अवघ्या ४८ चेंडूत १०५ धावांची स्फोटक शतकीय खेळी साकारली. या खेळीत त्याने ७ षटकार आणि ८ चौकार ठोकले. विल जॅक्सनेही (३५) त्याला चांगली साथ दिली.
सामना शेवटच्या षटकापर्यंत ताणला गेला होता. ६ चेंडूत ३० धावांची गरज असताना आणि बेथेल खेळपट्टीवर असताना काहीही घडू शकले असते. मात्र, याच वेळी शतकी खेळी करणारा बेथेल धावबाद (Run Out) झाला आणि वानखेडेवर एकच जल्लोष झाला. बेथेल बाद झाला आणि मॅच फिरली! इंग्लंडला २० षटकात २४७ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताने ७ धावांनी विजय खेचून आणला.
दुसरीकडे, बुधवारी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून न्यूझीलंडने आधीच अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. आता क्रिकेट विश्वाच्या नजरा ८ मार्च २०२६ कडे लागल्या आहेत.
तारीख: ८ मार्च २०२६
मैदान: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
लढत: भारत विरुद्ध न्यूझीलंड (विश्वचषक फायनल)
टीम इंडिया आता आपल्या मायदेशात वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज झाली आहे!
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.