
नवी दिल्ली ः प्रत्येक वडिलांचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने करिअरमध्ये प्रगती करावी आणि जगभरात आपला झेंडा फडकवावा. यासाठी ते जीवापाड मेहनत करतात. आपल्या मुलाला एक यशस्वी व्यक्ती बनवण्यासाठी वडील म्हणून ते काहीही करायला तयार असतात. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याचे वडील संजीव सूर्यवंशी यांचीही अशीच काहीशी कहाणी आहे. सूर्यवंशींचे वडील शेतकरी आहेत. तरीही त्यांनी मुलाला क्रिकेटपटू बनवण्याचा निश्चय केला. आणि तो पूर्णही केला.
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा ताजपूर गावातून आलेल्या वैभवचे वडील शेती करतात. टीम इंडियासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वैभवकडे क्रिकेट शिकण्याची साधने नव्हती. या परिस्थितीत त्याच्या वडिलांनी त्याला गावापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी पाटण्याला प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. मुलाला क्रिकेटचे धडे देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पैशांचा कोणताही मोठा स्रोत नसल्याने त्याच्या वडीलांनी पडिलोपार्जीत जमीन विकली. त्यातून आलेल्या पैशांमधून वैभवचे प्रशिक्षण सुरु ठेवले. यावेळी त्यांना बऱ्याचवेळा त्यांच्या इच्छांना मुरड घालावी लागली. मोठा संघर्ष करावा लागला.
वैभवला क्रिकेटपटू बनवण्याच्या विचारांनी संजीव सूर्यवंशी यांनी सर्वस्व पणाला लावले. जेव्हा वैभव १० वर्षांचा होता, तेव्हा तो आपल्यापेक्षा मोठ्या मुलांसोबत प्रशिक्षण घ्यायचा. एका दिवसात ते ६००+ चेंडू खेळूनच थांबायचा. वैभवची जिद्द आणि वडिलांचा दृढनिश्चय वाया गेला नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात किंवा प्रत्येक गल्ली आणि वस्तीतला मुलगा क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहतो. तथापि, काहींचे नशीब आणि मेहनत फळास येते, तर काही कमतरतेमुळे तेथे पोहोचू शकत नाहीत. वैभवसोबतही असेच झाले असते, तर त्याच्यासोबत वडिलांचा विश्वासही मोडला असता. पण नशिबाने आणि कठोर परिश्रमाने त्यांच्यासोबत असे होऊ दिले नाही.
लहानपणापासून टीम इंडियासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वैभवचे नशीब तेव्हा चमकले जेव्हा राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आयपीएल २०२५ मेगा लिलावात त्याला १ कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय घेतला. १४ वर्षीय वैभवला पाहून जगातील सर्व क्रिकेट चाहत्यांना विश्वास बसत नव्हता. त्याच्या वयाबाबत प्रश्नही उपस्थित झाले. पण जेव्हा त्याला आरआरने मैदानात उतरवले तेव्हा सर्वांच्या तोंडाला कुलूप लागले. वैभवने षटकाराने आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या खेळीला बघून असे वाटते, की वडीलांनी वडिलोपार्जीत जमीन विकून योग्य निर्णय घेतला. आयपीएलमध्ये खेळल्याने तो आता ती जमीन परतही मिळवू शकतो.
वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात आपली गुणपत्ता सिद्ध केली. त्याने केवळ ३५ चेंडूत शतक झळकावले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. वैभव सर्वात कमी वयात शतक झळकावणारा टी२० फलंदाज ठरला आहे. सर्वात कमी वयात आयपीएल शतक झळकावणारा फलंदाज, सर्वात जलद आयपीएल शतक झळकावणारा पहिला भारतीय, सर्वात जलद शतक आयपीएलमध्ये झळकावणारा दुसरा खेळाडू, एका डावात सर्वाधिक षटकार (११) झळकावणारा फलंदाज, सर्वात कमी षटकांत आयपीएल शतक झळकावणारा जगातील तिसरा फलंदाज तो झाला आहे. त्याच्या या डावाला पाहून सचिन तेंडुलकरसारखे दिग्गजही कौतुक करत आहेत.