
समरकंद : समरकंदमध्ये सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२६ मध्ये भारतीय संघाने आपली शानदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात ओपन आणि महिला या दोन्ही गटांत भारताने ३-१ असा दणदणीत विजय मिळवला. ओपन संघाने स्पेनचा पराभव केला, तर महिला संघाने मंगोलियावर मात करत सलग चौथा विजय खिशात घातला.
फिडे (FIDE) वेबसाइटनुसार, अर्जुन एरिगेसी आणि डी गुकेश यांनी आपापले सामने जिंकून भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली. तर आर प्रज्ञानंद आणि निहाल सरीन यांनी आपले सामने बरोबरीत सोडवले. गुकेशने ४२ चालींमध्ये अलेक्सी शिरोव्हचा पराभव केला, तर अर्जुन एरिगेसीने अवघ्या ३६ चालींमध्ये मॅक्सिम चिगायेव्हला हरवले.
पहिल्या बोर्डवर खेळणाऱ्या प्रज्ञानंदने काळ्या सोंगट्यांसह खेळताना डेव्हिड अँटोनसोबतचा आपला सामना ३८ चालींनंतर बरोबरीत सोडवला. दुसरीकडे, निहाल सरीननेही ३० चालींनंतर जेम सँटोसला बरोबरीत रोखले. यासह भारताने स्पेनवर ३-१ असा शानदार विजय निश्चित केला.
या विजयामुळे ओपन गटात सलग चार सामने जिंकणाऱ्या मोजक्या संघांमध्ये भारताने आपले स्थान कायम ठेवले आहे. चार फेऱ्यांनंतर चीन, यजमान उझबेकिस्तान, जर्मनी, आर्मेनिया, अमेरिका, नेदरलँड्स आणि हंगेरी हे संघही अद्याप अजिंक्य आहेत.
महिला गटातही भारतीय संघाने आपली विजयी लय कायम राखत मंगोलियाचा ३-१ असा पराभव केला. दिव्या देशमुख आणि सविता श्री यांनी आपापले सामने जिंकले. सविताने सलग चार सामने जिंकत आपली अपराजित राहण्याची मालिका (4/4) कायम ठेवली आहे. पहिल्या दोन बोर्डवरील सामने मात्र बरोबरीत सुटले.
कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली यांनी पहिल्या दोन बोर्डवर खेळताना आपले सामने बरोबरीत सोडवले. हम्पी आणि बट-एर्डेन मुंगुन्झुल यांच्यातील सामना ८२ चालींनंतर बरोबरीत सुटला. तर वैशालीने ७५ चालींच्या दीर्घ संघर्षानंतर तुर्मुख मुंखझुलसोबतचा सामना बरोबरीत सोडवला.