Virat Kohli : 'विराट कोहली 100 शतकांचा टप्पा नक्की गाठेल', अजिंक्य रहाणेला विश्वास

Published : Sep 28, 2026, 03:08 PM IST
Virat Kohli : 'विराट कोहली 100 शतकांचा टप्पा नक्की गाठेल', अजिंक्य रहाणेला विश्वास

सार

विराट कोहली सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम नक्की मोडेल, असा विश्वास अजिंक्य रहाणेने व्यक्त केला आहे. पण आपण विक्रमांसाठी नाही, तर संघासाठी खेळतो, असं विराटने स्पष्ट केलं. सचिन आणि धोनीबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर राहील, असंही तो म्हणाला.

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम विराट कोहली नक्कीच पूर्ण करू शकतो, असा विश्वास भारताचा माजी खेळाडू अजिंक्य रहाणेने व्यक्त केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विराटने ८६ वे शतक झळकावल्यानंतर रहाणेने ही प्रतिक्रिया दिली. जेव्हा विराट स्वतःवर दबाव घेतो, तेव्हा तो अधिक चांगली कामगिरी करतो. त्यामुळे आपला आदर्श असलेल्या सचिनचा विक्रम मोडण्याचा विचार विराट नक्कीच करत असेल, असं रहाणे म्हणाला.

'क्रिकबझ' या क्रिकेट वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रहाणेने हे मत मांडलं. अनेकदा लोक विक्रम आणि टप्पे गाठण्याच्या विचाराला स्वार्थीपणा मानतात. पण विराटच्या बाबतीत बोलायचं तर, असा दबाव त्याला अधिक चांगला खेळायला मदत करतो, असं रहाणेने स्पष्ट केलं.

पण सामन्यानंतर विराटने मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली. आपण नेहमीच विक्रमांचा विचार करत नाही, असं तो म्हणाला. परिस्थितीनुसार संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करणं हेच आपलं ध्येय असतं आणि खेळाचा आनंद घेण्याला आपण प्राधान्य देतो, असं विराटने स्पष्ट केलं.

विराट म्हणाला, "माझ्यासाठी सचिन नेहमीच सचिन राहील. माझा पहिला कर्णधार म्हणून एमएस धोनी नेहमीच धोनी राहील. माझ्या मनात त्यांच्याबद्दलची भावना कधीच बदलणार नाही. मी खूप काही मिळवलंय आणि मी खूप मोठा माणूस झालोय, असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही." आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असं कधीच वाटलं नाही. क्रिकेटसाठी कठोर मेहनत घेणं आणि योग्य गोष्टी करणं, यावरच आपला नेहमी भर असतो, असंही विराटने सांगितलं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Virat Kohli Century : विराट कोहलीचं ५५ वं शतक, 'चॅम्पियन'च्या खेळीवर कुटुंबाचा जल्लोष
RCB: आरसीबी फॅन्ससाठी भारी बातमी, आता फॅशनच्या दुनियेतही रचला इतिहास!