
मुंबई : वसई-विरार भागात गटार साफसफाई आणि कचरा टाकण्यासाठी राखीव असलेल्या ६० एकर जागेवर ४१ बेकायदेशीर इमारती बांधल्या होत्या. या प्रकरणात वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि आणखी तिघांना ईडीने अटक केली.
४ ऑगस्ट रोजी ईडीने पवार आणि त्यांच्या पत्नीची १० तास चौकशी केली होती. त्यानंतर पवार यांची अजून दोन वेळा वेगवेगळी चौकशी झाली. बुधवारी झालेल्या चौकशीनंतर पवार, नगर रचनाकार वाय. एस. रेड्डी, या बांधकामातील मुख्य आरोपी सीताराम गुप्ता आणि त्याचा मुलगा अरुण गुप्ता यांना अटक करण्यात आली.
याआधी ईडीने या प्रकरणातील इतर लोकांवर केलेल्या छाप्यांमध्ये ८ कोटी ९४ लाख रुपयांची रोकड, २३ कोटी २५ लाख किमतीचे हिरे व सोन्याचे दागिने, १३ कोटी ८६ लाख किमतीचे शेअर्स, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि बँक ठेवी जप्त केल्या होत्या.
२९ जुलै रोजी ईडीने पवार यांच्या घरासह १२ ठिकाणी छापे टाकले. नाशिक येथील त्यांच्या पुतण्याच्या घरी १ कोटी ३३ लाख रुपयांची रोकड सापडली. तसेच नातेवाईकांच्या नावावर आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्रेसुद्धा मिळाली.
राज्यात काही दिवसांपासून थांबलेला पाऊस आता पुन्हा बरसू लागला आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान अंदाजानुसार, 13 ते 15 ऑगस्टदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यात 14 आणि 15 ऑगस्टला पावसाचा अलर्ट आहे. विदर्भात अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, इतर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे.
मुंबईत मध्यरात्रीपासून पाऊस सुरू असून पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईच्या काही भागात जोरदार सरी कोसळत आहेत. पुढील तीन-चार तास मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना तेथून पूर्णपणे हलवण्याच्या नुकत्याच दिलेल्या निकालावर झालेल्या विरोधामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजरिया गुरुवारी सुनावणी घेणार आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठाने आठ आठवड्यांत कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये हलवण्याचे आदेश दिले होते, ज्यावर प्राणी हक्क संघटना आणि मान्यवरांनी विरोध दर्शविला होता. दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेने आधीच १०० हून अधिक कुत्र्यांना नियंत्रण केंद्रांमध्ये हलवले आहे.
मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित ऑनलाइन बेटिंग अॅपच्या प्रचार प्रकरणात माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला बुधवारी ईडी अधिकाऱ्यांनी दिल्लीत चौकशीसाठी बोलावले. सकाळी ११ वाजता ते ईडी कार्यालयात हजर झाले. बेटिंग अॅपचा प्रचार, संबंध आणि मिळालेल्या मानधनाबाबत चौकशी झाली. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने मंगळवारी अनेक राज्यांमध्ये छापे टाकले आणि अनेक जणांची चौकशी केली.
रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन अलास्कात भेटणार आहेत. रशियाकडून पूर्वी खरेदी केलेले हे राज्य भौगोलिक आणि व्यूहरचनात्मकदृष्ट्या अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहे. अलास्कात पाऊल ठेवणारे पुतिन हे रशियाचे पहिलेच अध्यक्ष असतील.
यापूर्वी जपानचे सम्राट हिरोहितो (१९७१), पोप जॉन पॉल II (१९८४), अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा (२०१५), चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (२०१७) यांसारख्या नेत्यांनी येथे भेट दिली आहे.
अलास्का १८६७ मध्ये रशियाकडून अमेरिकेने ७२ लाख डॉलर्सला खरेदी केले होते. १९५९ मध्ये ४९ वे राज्य म्हणून उदयास आलेला हा प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे अमेरिकेसाठी प्रमुख केंद्र बनला आहे. बेरिंग सामुद्रधुनीतील लिटिल डायोमेड बेट रशियापासून केवळ ५ कि.मी. अंतरावर आहे.
यावर्षी स्वातंत्र्यदिन “ऑपरेशन सिंधूर” विजय उत्सव म्हणून साजरा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्ट रोजी देशभरातील १४० प्रमुख ठिकाणी लष्कर आणि पॅरामिलिटरी दलांचे बँड विशेष संगीत कार्यक्रम सादर करतील.
या कार्यक्रमाद्वारे विजयोत्सव जनतेपर्यंत पोहोचवणे आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवणे हे उद्दिष्ट आहे. आमंत्रण पत्रिकेवर ऑपरेशन सिंधूरचा लोगो आणि चिनाब पुलाचे चित्र छापण्यात आले आहे.