
मुंबई : मुंबईत ठाकरे बंधूंनी गर्जना मोर्चा काढला आहे. रविवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळीपासूनच मोर्चाला सुरुवात झाली आहे. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागातून अनेक कार्यकर्ते मुंबईतील मोर्चास्थळी दाखल झाले आहेत. ठाकरे बंधूंच्या या मोर्च्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी गट, काँग्रेस आणि शेकापदेखील सहभागी झालं आहे. मेट्रो सिनेमा ते महानरपालिकेच्या मुख्य कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे. हातात तिरंगा घेऊन हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्च्यात सहभागी झाले आहेत. ठाकरे बंधूंच्या या मोर्च्यात मविआच्या नेत्यांची उपस्थिती आहे.
लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी तसचं निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंनी हा गर्जना मोर्चा काढला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा अर्थात कोणताही पक्षीय झेंडा या गर्जना मोर्च्यात नसेल असं ठाकरे बंधूंकडून आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसारच मोर्च्यात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा न घेता आपला तिरंगा हातात घेत मोर्च्यात सहभाग घेतला आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मतदार यादीतील घोटाळे, एसआयआरचा मुद्दा, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती या सगळ्या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्त्वात भारतातील विविध ठिकाणी याविरोधात आंदोलनं झाली. विरोधी पक्षांकडून वारंवार याविरोधात आवाज उठवला जात होता.
दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीनेही मुंबईतील शिवाजी पार्क इथे याविरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनालादेखील ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता स्वत: ठाकरे बंधूंनी ४ ऑक्टोबरला गर्जना मोर्चाचं आयोजन केलं असून मोठ्या संख्येने गर्दी जमली आहे.