मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण परिसरात आज देखील वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, तर मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून कोकण परिसरात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई: राज्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे आणि पाऊस बरसताना दिसत आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई या भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने कोकण परिसरात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मात्र, दुपारनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. येत्या तीन ते चार तासांमध्ये ठाणे, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि रायगडातील काही भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. या भागात जवळपास 40 ते 50 किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहतील. त्याचसोबतच या सर्व परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
प्रवाशांना खबरदारी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मंगळवारी संध्याकाळी पुन्हा पाऊस झाल्यास रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. आज देखील मुंबईतील चाकरमान्यांना घरी जाताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कालच्या तुलनेत आज वाऱ्याचा वेग कमी राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. परंतु, वाऱ्यांचा वेग हा नेहमीपेक्षा जास्त असेल, तसेच पाऊसही असेल. त्यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आली आहे.