Mercedes SUV Damage : मुंबईत उंदरांनी कुरतडली 1 कोटींची मर्सिडीज, गाडीशिवाय डॉक्टर दाम्पत्य भरतंय २.५ लाखांचा EMI

Published : Nov 10, 2026, 06:11 PM IST
Merc Damaged

सार

मुंबईतील एका डॉक्टर दाम्पत्याची १ कोटी रुपयांची मर्सिडीज एसयूव्ही गेल्या तीन महिन्यांपासून ठाण्यातील एका वर्कशॉपमध्ये पडून आहे. उंदरांनी गाडीची वायरिंग कुरतडल्याने ही वेळ आली असून, गाडी नसतानाही या दाम्पत्याला दर महिन्याला २.५ लाख रुपयांचा EMI भरावा लागत आहे.

मुंबई : एका डॉक्टर दाम्पत्याला एका विचित्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या लक्झरी मर्सिडीज-बेंझ इलेक्ट्रिक एसयूव्हीची वायरिंग उंदरांनी कुरतडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ही गाडी गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून ठाण्यातील एका सर्व्हिस सेंटरमध्ये पडून आहे.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, त्वचा तज्ज्ञ डॉ. अमित कारखानीस आणि त्यांच्या पत्नी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनघा कारखानीस यांनी जुलै २०२४ मध्ये सुमारे १ कोटी रुपयांना Mercedes-Benz EQE 500 4MATIC ही कार खरेदी केली होती.

२७ ऑगस्ट रोजी उंदरांमुळे गाडीचे नुकसान झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपली गाडी ठाण्यातील लँडमार्क कार्सच्या वर्कशॉपमध्ये नेली आणि इथूनच खऱ्या त्रासाला सुरुवात झाली. त्यांच्या इन्शुरन्स कंपनीने दुरुस्तीसाठी तत्काळ मंजुरी दिली असली तरी, गाडीचे विशेष वायरिंग हार्नेस थेट जर्मनीवरून आणावे लागणार असल्याने गाडी अद्याप वर्कशॉपमध्येच आहे. हा पार्ट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दाम्पत्याची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.

गाडीचा वापर नसतानाही दाम्पत्य भरतंय २.५ लाखांचा मासिक EMI

या विलंबामुळे या दाम्पत्यावर मोठा आर्थिक ताण पडत आहे. गाडीचा वापर करता येत नसतानाही त्यांना दर महिन्याला सुमारे २.५ लाख रुपये ईएमआय भरावा लागत आहे.

या परिस्थितीमुळे त्यांच्या दैनंदिन दिनचर्येतही अडथळा निर्माण झाला आहे. सध्या त्यांच्या अंधेरीतील घराचे नूतनीकरण सुरू असल्याने ते ठाण्यात राहत आहेत. पण, दोघांनाही कामासाठी वांद्रे येथे जावे लागते.

पर्यायी गाडी न मिळाल्याने आणि दुरुस्ती कधी पूर्ण होईल याची निश्चित तारीख नसल्यामुळे डॉ. अमित कारखानीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मर्सिडीज उपलब्ध नसल्यामुळे एका वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी त्यांना कॅबची व्यवस्था करावी लागल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

गाडी वर्कशॉपमध्ये पडून असतानाही वॉरंटी आणि इन्शुरन्स कव्हरेज सुरूच असल्याने मालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

मर्सिडीज डीलरशिपचे स्पष्टीकरण, म्हणाले पार्ट जर्मनीहून मागवला

या तक्रारींवर लँडमार्क कार्सच्या कस्टमर एक्सपिरियन्सच्या जनरल मॅनेजर शेफाली शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी उंदरांनी गाडीची वायरिंग हार्नेस कुरतडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

त्या म्हणाल्या की, आवश्यक पार्ट जर्मनीहून मागवण्यात आला असून तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भारतात पोहोचण्याची अपेक्षा आहे. डीलरशीपने ग्राहकाला या अंदाजित वेळेबद्दल आधीच माहिती दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पर्यायी गाडीच्या मागणीबद्दल बोलताना शिंदे यांनी सांगितले की, अशा सुविधा सहसा वॉरंटीशी संबंधित प्रकरणांमध्ये दिल्या जातात. पण, सध्याचे प्रकरण अपघाती नुकसानीच्या श्रेणीत हाताळले जात आहे. तसेच सणासुदीच्या काळात डीलरशिपच्या सर्व पर्यायी गाड्या वापरल्या जात होत्या, असेही त्यांनी सांगितले.

या घटनेमुळे भारतात आयात केलेल्या लक्झरी इलेक्ट्रिक वाहनांच्या दुरुस्तीत येणाऱ्या अडचणींकडेही लक्ष वेधले गेले आहे. मर्सिडीज ईक्यूई ५०० ही कम्प्लीटली बिल्ट युनिट (CBU) म्हणून आयात केली जाते. त्यामुळे काही विशेष पार्ट्स परदेशातून मागवावे लागतात, ज्यामुळे दुरुस्तीला जास्त वेळ लागू शकतो.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Police Security Alert: 'गर्दीच्या ठिकाणी अचानक जाणं टाळा', मुंबई पोलिसांचा बॉलिवूड सेलिब्रिटींना इशारा
Mercedes SUV Rat Damage: मुंबईत १ कोटीच्या मर्सिडीजला उंदरांचा फटका; कार गॅरेजमध्ये, पण डॉक्टर भरतायत २.५ लाखांचा ईएमआय