
मुंबई : सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे, पण मुंबईतल्या गणेशोत्सवाची गोष्टच वेगळी. गल्लोगल्लीत बाप्पाचं आगमन झालंय. यातच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरीही गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून अंबानींच्या घरी उत्सवाला सुरुवात झाली आहे. मूर्ती स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत, सगळा कार्यक्रम अगदी भव्यदिव्य असतो. सध्या अंबानींच्या घरच्या गणेशोत्सवाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या उत्सवासाठी मुकेश अंबानींचं 'अँटिलिया' हे घर पूर्णपणे सजवण्यात आलं आहे. संपूर्ण घराला फुलं, तोरणं आणि आकर्षक लायटिंगने सजवलं आहे. या सोहळ्यासाठी कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि अनेक मोठे पाहुणे आले आहेत. अंबानींच्या घराच्या सजावटीचे व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. प्रत्येक गोष्टीत भव्यता दिसून येत आहे. घराला एखाद्या मंदिराप्रमाणे सजवण्यात आलं असून, त्यासाठी मंदिरासारखे खांब, प्रवेशद्वार आणि इतर सजावटीचा वापर केला आहे.
मुकेश अंबानी यांचं घर, ऑफिस आणि त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर आधीच कडक सुरक्षा असते. आता या गणेशोत्सवाच्या सोहळ्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे घरात नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबतच सुरक्षा कर्मचारीही मोठ्या संख्येने दिसत आहेत.
अंबानींच्या घरी गणपती बाप्पाच्या मूर्तीचं आगमनही मोठ्या थाटामाटात झालं. ज्या गाडीतून मूर्ती आणली, ती गाडीसुद्धा फुलांनी सजवली होती. भजन आणि जयघोषात बाप्पाला घरी आणण्यात आलं. आता मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा सुरू आहे. अंबानींच्या घरच्या या भव्य गणेशोत्सवाचे व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहेत.