Maharashtra Weather Update : राज्यभरात पावसाचा जोर वाढणार, पुढील ४ दिवस मुसळधार

Published : Jul 19, 2026, 09:09 AM IST
Maharashtra Rain Update

सार

Maharashtra Weather News : मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. २२ जुलैपर्यंत पावसाची परिस्थिती कशी असेल? हवामान खात्याकडून राज्यभरातील पावसाबाबत महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहेत.

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील अनेक भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे. आज मुंबई आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल. आज दुपारी मुंबई आणि लगतच्या भागांवर मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. पावसाचा जोर मध्यम ते मुसळधार या स्वरुपाचा असेल. पुढील चार दिवस २२ जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल.

ठाणे, पालघर, नवी मुंबईत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात सखल भागात पूर्ण येण्याची शक्यताही आहे. किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र यांसारखी परिस्थिती असेल. तसंच दरडी कोसळणं, भूस्खलन यासारख्या धोक्यांकडेही हवामान विभागाकडून लक्ष वेधण्यात आलं आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसंच, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे.

काल शनिवारी हवामान खात्याने घाट परिसरात, कोकण आणि पूर्ण विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या भागात पावसाचा जोर कायम असून पावासाची ही परिस्थिती जवळपास आठवडाभर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसासाठी पोषक परिस्थिती कायम असून, राज्यभरात मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे.

दरम्यान, देशातील अनेक भागात मान्सूनची सक्रिय स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख या अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रशासनाकडून धोकादायक भागात गरज नसल्यास प्रवास टाळण्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करुन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टर करणार, महाराष्ट्रातील ओपीडी २० जुलै रोजी बंद राहणार
महेश ट्युटोरियल्सची 33 केंद्रे अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला