कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी 4,300 जादा बसेस, असे करा ऑनलाईन तिकीट बुक

यंदाच्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने विशेष तयारी केली आहे. २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा बसेस कोकणात सोडण्यात येणार आहेत.

मुंबई : यंदाच्यावर्षी 17 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी (ST) महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या (Kokan) चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे.

2 सप्टेंबरपासून प्रमुख बसस्थानकातून जादा बसेस सुटणार

2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी 3500 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते.

कसे कराल एसटी बस आरक्षण?

यंदा सुमारे 4300 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे.

चाकरमान्यांचा सेवेसाठी एसटी सज्ज

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

चाकरमान्यांची परवड थांबवण्यासाठी 202 विशेष ट्रेन

गणेशोत्सवासाठी कोकणमध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता अधिक सुखाचा होणार आहे. कोकणासाठी 202 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हजारो चाकरमान्यांची ही परवड थांबवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणमध्ये जात असतात. या काळात बस किंवा ट्रेनचे बुकिंग मिळत नाही. त्यामुळे या काळात आता अतिरिक्त 202 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून आता एसटी महामंडळानेही तब्बल 4300 जादा बसेसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणवासियांना गावाकडे जाण्यासाठी आता सार्वजनिक वाहतूक सहजपणे उपलब्ध होऊ शकेल.

आणखी वाचा :

भाजप ही चोरांची कंपनी, कार्यकर्त्यांच्या सभेत उद्धव ठाकरेंचा एल्गार

 

 

Share this article