सासूवर अत्याचार करणाऱ्या जावयाला उच्च न्यायालयाचा दणका

मात्र, आरोपीने हे कृत्य केल्याचे नाकारले आणि हा परस्पर संमतीने झालेला संबंध असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्याच्यावर तीव्र टीका केली.

सासूवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध बॉम्बे उच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी हा निकाल दिला.

न्यायमूर्ती जी. ए. सनप यांच्या एकल खंडपीठाने हे कृत्य लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. पीडित महिला आरोपीसाठी आई समान होती. २०१८ मध्ये ५५ वर्षीय सासूवर बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. २०२२ मध्ये हा निकाल दिला गेला होता. आरोपीने सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले होते.

फिर्यादी महिलेने सांगितले की, तिची मुलगी आणि जावई वेगळे राहत होते. मुलीची दोन मुले जावयासोबत राहत होती. मुलगी आणि ती यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी आरोपी सासूला विनंती करत असे. त्यामुळेच ती आरोपीच्या घरी गेली होती. तिथे आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिने मुलीला ही घटना सांगितली. मुलीनेच तिला पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर तिने तक्रार दाखल केली.

मात्र, आरोपीने हे कृत्य केल्याचे नाकारले आणि हा परस्पर संमतीने झालेला संबंध असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्याच्यावर तीव्र टीका केली. पीडित महिला ५५ वर्षांची आहे. ती आरोपीच्या आईच्या वयाची आहे. आरोपीने तिला आई समान मानायला हवे होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. जर हा संबंध परस्पर संमतीने झाला असता तर तिने मुलीला आणि पोलिसांना ही घटना सांगितली नसती, असेही न्यायालयाने नमूद केले.

आरोपीने स्त्रीत्वाचा अपमान केला आहे. पीडितेच्या स्वप्नातही असे घडेल असे तिने कधी विचार केला नसेल. आरोपीने केलेले कृत्य अत्यंत लज्जास्पद आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Share this article