Vaishnavi Hagawane Case: पती शशांक हगवणे, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Published : May 29, 2025, 05:23 PM IST
Vaishnavi Hagawane Case

सार

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिच्या पती, सासू आणि नणंदला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा खोटा फोन करणाऱ्याला अटक करण्यात आली असून, वैष्णवीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत.

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई झाली असून, तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यापूर्वी तिघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र तपास पूर्ण झाल्याचे कारण देत आता त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात येणार आहे.

सुनावणीत काय घडलं?

तिघा आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर, पोलीस तपास पूर्ण झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. याआधी दोन वेळा पोलीस कोठडी घेण्यात आली होती. आता पुढील तपासासाठी गरज वाटल्यास पुन्हा पोलिस कोठडीची मागणी होऊ शकते. सध्या मात्र न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे तिघांना कारागृहात ठेवण्यात येणार आहे.

खोटा फोन करून दिशाभूल करणाऱ्याला अटक

या प्रकरणात आणखी एक वळण आलं आहे. फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा बनावट फोन करणाऱ्या संतोष दत्तात्रय गायकवाड या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. फोन नंबरच्या आधारे लोकेशन शोधून त्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल कस्पटेंचे गंभीर आरोप

वैष्णवी हगवणे हिचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकारांशी बोलताना गंभीर आरोप केले. "काल आरोपींचे वकील कोर्टात जे बोलले, ते समाजाने ऐकले – आणि ते पूर्णतः चुकीचे होते. एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर आरोप करणे हे नीच आहे," असं ते म्हणाले.

हुंड्यासाठी सतत छळ केला गेला, हे स्पष्ट करताना अनिल कस्पटे म्हणाले, "मी आधी एमजी हेक्टर गाडी बुक केली होती, पण शशांक हगवणे याने फॉर्च्यूनर न दिल्यास हेक्टर पेटवून देण्याची धमकी दिली. म्हणून आम्ही फॉर्च्यूनर गाडी दिली. आजही त्या मोबाईलचे हप्ते मीच भरतो."

तसंच, वैष्णवीचं हे तिसरं लग्न ठरणार होतं, आधीची दोन लग्नं मोडल्याला हगवणे कुटुंब जबाबदार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. "गाडी, चांदीची ताटं, सोनं अशी विविध मागण्या वारंवार करण्यात आल्या," असा आरोपही त्यांनी केला.

निलेश चव्हाणही कटात सहभागी?

"निलेश चव्हाण हा देखील या संपूर्ण कटात सहभागी होता. त्या दिवशी तो तिथेच होता," असा दावा अनिल कस्पटे यांनी केला आहे. पोलिसांनी आता निलेश चव्हाणचा शोध अधिक गतीने सुरू केला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नव्या घडामोडी समोर येत आहेत. पोलिस तपास वेग घेत आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया पुढे सरकत आहे. या प्रकरणात न्याय मिळावा, अशी अपेक्षा वैष्णवीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक