
उमरखेड: शहरातील आठवडी बाजार परिसरात काल (रविवार) मध्यरात्री थरारक गँगवारसारख्या हाणामारीत २३ वर्षीय युवकाचा चाकू, तलवार आणि लोखंडी रॉडने अमानुष खून करण्यात आला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या झटापटीत आणखी दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत.
मृत युवकाचे नाव अजहर शेख अकबर (वय २३) असे असून, जखमींमध्ये शेख मुदशीर शेख जमीर (वय २७) आणि शेख आरिफ शेख निसार (वय २२) यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, काल संध्याकाळी ताजपुरा वॉर्डात दोन गटांमध्ये वाद झाला होता. हा वाद पुढे गटातळ्याच्या स्वरूपात मध्यरात्री १२ ते १२.३० वाजताच्या सुमारास आठवडी बाजारात उफाळून आला. दोन्ही गट समोरासमोर भिडले आणि तुफान हाणामारी सुरु झाली.
या झटापटीत शेख मुदस्सीर शेख जमीर, शेख सोहेल शेख जमीर (रा. ताजपुरा वॉर्ड), शेख उबेद निसार (रा. ताजपुरा वॉर्ड), शेख आरीश शेख खतीब (रा. हुतात्मा चौक) आणि अन्य ३–४ जणांनी मिळून अजहर शेख अकबर याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांनी चाकू, तलवार व रॉडने त्याच्या मान, पाठीवर व पोटावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या अजहरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. अजूनही हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकरणामागे गँगवार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, किमान दहा युवक या झटापटीत सहभागी होते, अशी माहिती समोर येत आहे.
मृत युवकाचा भाऊ शेख खालीद शेख अकबर याने उमरखेड पोलिसात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे उमरखेड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.