Arbaz Shaikh : 'सैराट'मधील सल्ल्याच्या व्हिडिओनंतर FDA ची मोठी कारवाई, Tukaram Mundhe यांनी मेडिकलमधील औषध विक्री थांबवली

Published : Jul 09, 2026, 04:06 PM IST
Arbaz Shaikh Solapur Hospital

सार

Solapur Sairat Actor Arbaz Shaikh : सैराट फेम अभिनेता अरबाज शेखने रुग्णालयाबाबतचा एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या FDA कडून रुग्णालय, तसंच तेथील संलग्न मेडिकलवर कारवाई करण्यात आली आहे. 

सोलापूर : सोलापूरमधील एका रुग्णालयावर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने धाड टाकली आहे. सैराट फेम अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने रडत आपल्या वडिलांना ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र रुग्णालयाने त्यांच्याच मेडिकलमधून औषधं खरेदी करण्याचं सांगितलं असा आरोप त्याने केला आहे. या व्हिडिओची FDA कडून दखल घेण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने दखल घेत सोलापुरातील या रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये धाड टाकली. सैराट फेम अभिनेत्याने व्हिडिओ केल्यानंतर रुग्णालयातील मनमानी कारभार, तसंच अनेक गंभीर त्रुटी असल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेता अरबाज शेख यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बोलताना त्याने सांगितलं, 'माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झालं आहे. त्यांची परिस्थिती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण इथे मला अतिशय घाण अनुभव आला, आम्ही पेशंटला अॅडमिट केल्यानंतर सर्वात आधी रुग्णालयाने १० हजार रुपये मागत डिपॉझिट भरायला सांगितलं. त्यानंतर गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या. त्यावर मी त्यांना या गोळ्या बाहेरुन आणू शकतो का असं विचारलं. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर देत, याच रुग्णालयाच्या मेडिकलमधून गोळ्या, इंजेक्शन घ्याव्या लागतील असं सांगितलं. त्यानंतर मी त्यांच्याच मेडिकलमधून ४० हजारहून अधिक रुपयांची औषधं घेतली. याच गोळ्य बाहेरुन आणल्या असत्या तर अर्ध्या किमतीत मिळाल्या असत्या. इथे लूट होतेय, माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायंच, मला मदत करा. मी वडिलांना नोबलमधून दुसरीकडे हलवलं. इथे मला वाईट अनुभव आला आहे.'

तुकाराम मुंढे यांचे आदेश

दरम्यान, १२ जून रोजी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक आदेश काढला होता. रुग्णालयातील मेडिकलमधूनच रुग्णांना औषध खरेदी करण्याची सक्ती नाही, असं या आदेशात सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अभिनेता अरबाज शेखने व्हिडिओ शेअर करत त्याच्या वडिलांना अॅडमिट केलेल्या रुग्णालयात त्यांच्याच मेडिकलमधून औषध घेण्याची सक्ती असल्याचा आरोप केला.

FDA च्या कारवाईत गंभीर त्रुटी आढळल्या

अरबाजने व्हिडिओमध्ये वडिलांच्या आजाराबाबत, त्यांना दाखल केलेल्या रुग्णालयातील लूटीबाबत माहिती शेअर केली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून याची दखल घेत रुग्णालयावर धाड टाकण्यात आली. यात FDA पथकाला नोबल रुग्णालय आणि रुग्णालयाशी संलग्न असलेल्या मेडिकलमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. मेडिकलमध्ये एक्सपायरी संपलेल्या गोळ्या सापडल्या. तसंच रुग्णालयातील ओपीडीमध्ये डॉक्टरांनी दिलेली औषधांची चिठ्ठी त्याच रुग्णालयातील मेडिकलमध्ये कम्प्युटरवर प्रिंट होते. त्यामुळे रुग्णांना याच रुग्णालयातून औषधं घेण्याचं सांगितलं जात असल्याचा पुरावा आढळला आहे. आता FDA कडून या मेडिकलमधून औषध विक्री थांबवण्यात आली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

टॅक्सी, रिक्षा, बस चालकांसाठी मराठी बंधनकारक; 16 ऑगस्टपासून अंमलबजावणी
Maharashtra : आज राज्यभर ‘शाळा बंद’ आंदोलन; शिक्षकांच्या सामूहिक रजेला सरकारचा इशारा