
पुणे: दररोज काही ना काही हटके, वेगळं आणि बघताक्षणी व्हायरल होणारं पाहायला मिळतं. त्यातही पुणेकरांचा नादच वेगळा! आता अशीच एक अजब पण प्रचंड चर्चेत आलेली घटना पुण्यात घडली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अलीकडच्या काळात SUV Mahindra Thar ची क्रेझ प्रचंड वाढली आहे. रस्त्यावरून गेली तरी लोक वळून-वळून पाहतात. पण याच थारची अक्षरशः “अब्रू काढणारी” घटना पुण्यात घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या महागड्या लाखोंच्या THAR गाडीसमोर दोन गाढवं बांधली, आणि ती रस्त्यातून ओढत थेट शोरूमकडे घेऊन गेला! एवढंच नाही, तर ढोल-ताशा वाजवत वरातच काढली. हा LIVE तमाशा पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली आणि काही क्षणातच व्हिडिओ व्हायरल!
संबंधित व्यक्तीला आपल्या नव्या थारमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येत होता. डीलरकडे कित्येकदा तक्रारी करूनही समस्या सुटत नव्हती. शेवटी कंटाळून त्याचा संताप शिगेला पोचला. आणि त्याने आपल्या थारची “थट्टा” करून डीलरला विरोध दर्शवण्याचा अनोखा मार्ग अवलंबला.
त्या व्यक्तीने थारच्या पुढे गाढवं बांधून मोठ्या आवाजात बॅण्ड वाजवत शोरूमकडे मोर्चा काढला. थारवर लावलेल्या बॅनरवर लिहिले होते. “सह्याद्री मोटर्स गाढव आहे! यांच्याकडून गाड्या घेऊ नका. ही कंपनी खराब गाड्या देऊन फसवणूक करते.” हे दृश्य इतकं विचित्र आणि अनोखं की क्षणातच ते सोशल मीडियावर गाजू लागलं.
पुणेकरांचा स्टाईलच वेगळा!
या व्हिडिओनंतर नेटिझन्समध्ये विनोदी कमेंट्स, मीम्स आणि चर्चांचा पाऊस पडू लागला आहे. एकंदर घटना पाहता पुणेकरांचा “नाद खुळा” हा टायटल पुन्हा एकदा सार्थ ठरला!