
पुणे : केतन अग्रवाल या २६ वर्षीय तरुणाची लोहगडावरुन ढकलून हत्या करण्यात आली. त्याच्याच होणाऱ्या पत्नीने म्हणजेच सिया गोयलने त्याला संपवलं. केतनच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना आणखी एक दु:खद घटना घडली आहे. केतनच्या ७१ वर्षीय आजोबांचं देवीचंद अग्रवाल यांचं दुर्दैवी निधन झालं आहे.
केतनच्या वडिलांकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून केतनचे आजोबा रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. केतनच वडील विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या सोशल मीडियावर मिस यू डॅड असं लिहत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केतनच्या आजोबांच्या निधनाच्या वृत्ताला जवळच्या लोकांनी दुजोरा दिला आहे.
केतनच्या निधनानंतर आजोबांना मानसिक धक्का
देवीचंद अंग्रवाल यांची काही दिवसांपूर्वी हृदयासंबंधी एक शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बरी होती. त्याच काळात केतनची हत्या झाली आणि संपूर्ण कुटुंब हादरलं. नातवाच्या अशाप्रकारे झालेल्या हत्येने त्यांना मोठा धक्का बसला होता. केतनच्या निधनानंतर निघालेल्या कँडल मार्चमध्येही आजोब देवीचंद सहभागी झाले होते. या कँडल मार्चमध्ये ते अतिशय भावूक होते. त्यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणीही केली होती.
कुटुंबात एकामागे एक नातू-आजोबांचा मृत्यू
केतनच्या मृत्यूनंतर देवीचंद यांची तब्येत ढासळू लागली. केतनच्या जाण्याचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला होता. त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्यांना मागील दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तब्येत अधिकच बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. केतनच्या मृत्यूनंतर महिन्याभरातच त्याच्या आजोबांच्या जाण्याने संपूर्ण अग्रवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.