
पुणे : निगडीच्या यमुना नगर भागातील एका मंदिरात १८ वर्षांखालील मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मेट्रोच्या एका कंत्राटी कामगाराला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा थरार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. निगडी पोलिसांनी आरोपी विशाल सिंग याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७४ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी या घटनेला आणि अटकेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, आरोपी खंडोबा माळ येथे एका कंत्राटदाराकडे मजूर म्हणून काम करत होता. "११ ऑक्टोबर २०२६ रोजी एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडली. याप्रकरणी बीएनएसचे कलम ७४ आणि पोक्सो कायद्याचे कलम ८, १० आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विशाल सिंग हा मजूर असून त्याला अटक करण्यात आली आहे," अशी माहिती बनसोडे यांनी दिली.
#Pune: पिंपरी-चिंचवडच्या निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मेट्रोच्या कंत्राटी कामगाराला अटक करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता viral होत आहे. हे प्रकरण अल्पवयीन मुलीशी संबंधित आणि अत्यंत संवेदनशील असल्याने लोकांनी हा व्हिडिओ शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
— Varad Bhatkhande | Journalist (@VaradBhatkhande) October 12, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मंदिरात दर्शनासाठी गेली असताना ही संतापजनक घटना घडली. या प्रकारानंतर परिसरातील महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच, बांधकाम प्रकल्पांवर काम करणाऱ्या कंत्राटदारांची आणि मजुरांची कसून चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
बीएनएसचे कलम ७४ हे महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे याच्याशी संबंधित आहे. तर पोलिसांनी लावलेली पोक्सो कायद्याची कलमे लहान मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करत आहेत.