
पुणे : मुग्धा देशमुख (वय ३४) ही मूळची छत्रपती संभाजीनगरची. ती युनायटेड किंगडममधील लंडनमध्ये शिक्षणासाठी गेली होती. पण घरच्यांना काहीही न सांगता ती भारतात परतली. पुणे शहरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. अनेक दिवस संपर्क न झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. 'आज तक'च्या वृत्तानुसार, मुग्धा लंडनमध्ये एमबीए करत आहे, असंच तिच्या घरच्यांना वाटत होतं.
तिच्या बँक स्टेटमेंटमध्ये फूड डिलिव्हरीचे काही व्यवहार दिसले. यावरून ती भारतात परतल्याचा संशय तिच्या पालकांना आला. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
मुग्धा गेल्या वर्षी जुलै महिन्यात एमबीए करण्यासाठी यूकेला गेली होती. तिथे ती एकटीच राहायची आणि शिक्षणासोबतच पार्ट-टाइम जॉबही करायची. पोलिसांच्या माहितीनुसार, ती फोन आणि मेसेजद्वारे सतत तिच्या आई-वडिलांच्या संपर्कात होती.
पण २४ ऑक्टोबरला तिने घरच्यांचे फोन आणि मेसेजला उत्तर देणं बंद केलं. त्यानंतर तिचा फोनही स्विच ऑफ येऊ लागला. यामुळे तिचे कुटुंबीय काळजीत पडले. तिच्या आई-वडिलांनी लंडनमधील तिच्या एका मैत्रिणीशी संपर्क साधला. २२ ऑक्टोबरला मुग्धासोबत मेसेजवर शेवटचं बोलणं झाल्याचं या मैत्रिणीने सांगितलं.
या मैत्रिणीने लंडन पोलिसांत जाऊन मुग्धा बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली. पण, मुग्धाने ऑगस्टच्या अखेरीसच यूके सोडल्याची धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी तिला दिली.
मुग्धा नेमकी कुठे आहे, याचा शोध घेण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी भारतीय अधिकारी आणि भारतीय उच्चायुक्तालयाची मदत घेतली. मुग्धाच्या वडिलांनी तिचं बँक स्टेटमेंट तपासलं. त्यात ८ ते २५ ऑक्टोबर दरम्यान फूड डिलिव्हरीचे अनेक व्यवहार झाल्याचं त्यांना दिसलं. 'आज तक'च्या वृत्तानुसार, यातील काही व्यवहार छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागातील होते.
या व्यवहारांमुळे मुग्धा लंडनमध्ये नसून भारतातच असल्याचा संशय बळावला. पोलिसांनी या व्यवहारांचा तपास केला आणि तिचं लोकेशन पुण्याच्या गहुंजे येथील 'लोढा बेलमोंडो' या निवासी संकुलात असल्याचं शोधून काढलं.
मुग्धा राहत असलेल्या या फ्लॅटवर पोलिसांचं पथक पोहोचलं. चावी बनवणाऱ्याच्या मदतीने पोलिसांनी दरवाजा उघडला, तेव्हा आत तिचा मृतदेह आढळून आला. पिंपरी चिंचवडमधील शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
मुग्धाच्या अंगावर कोणत्याही जखमांच्या खुणा नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. तिने एप्रिलमध्ये हा फ्लॅट भाड्याने घेतला होता, पण ती ऑगस्टपासून तिथे राहायला आली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. यावरून मृतदेह सापडण्यापूर्वी काही दिवस आधीच तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. मात्र, मृत्यूची नेमकी वेळ आणि कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ती यूकेहून अचानक का परतली आणि पुण्यात का राहत होती, याचा पोलीस आता तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.