
मुंबई : आज मुंबईतील प्रभादेवी परिसरात एक आनंदाचा क्षण साजरा झाला. शरद पवार यांचे नातू आणि युवा नेते युगेंद्र पवार यांचा तनिष्का कुलकर्णी यांच्यासोबत साखरपुडा पार पडला. या खास प्रसंगी पवार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नातेवाईकांनी या समारंभाला आपली उपस्थिती नोंदवली.
साखरपुड्याचा कार्यक्रम तनिष्का कुलकर्णी यांच्या प्रभादेवी येथील इंडियाबुल्स इमारतीतील निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाने पवार कुटुंबात पुन्हा एकदा एकोप्याचे दर्शन घडवले.
गेल्या काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा पुण्यात दिमाखात पार पडला होता. त्या कार्यक्रमानंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा युगेंद्र आणि तनिष्काच्या साखरपुड्यानिमित्त एकत्र आले आहे.
युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र असून, ते राजकारणात सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांनी अलीकडील विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजकीय मतभेद जरी दिसून आले असले, तरी कौटुंबिक नातेसंबंध कायम घट्ट असल्याचे या सोहळ्यातून स्पष्ट झाले.
तर तनिष्का कुलकर्णी या शिक्षित, अभ्यासू आणि दिलखुलास स्वभावाच्या युवती असून, त्या देखील सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. त्यांच्या आणि युगेंद्रच्या जुळलेल्या या नात्यामुळे पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पवार कुटुंबातील प्रमुख नेते आणि सदस्य एकत्र आल्याने समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पवार कुटुंबात सलग दुसऱ्यांदा होणारा साखरपुडा आधी जय पवार आणि आता युगेंद्र यामुळे घरातील आनंद द्विगुणित झाला आहे. कौटुंबिक कार्यक्रमांतून एकत्रितपणा आणि स्नेह दृढ करणारे असे हे क्षण केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर त्यांच्या चाहत्यांसाठीही विशेष ठरत आहेत.