जिद्द डोंगराएवढी! बाळंतपणाच्या जखमा ओल्या असतानाही १० दिवसांच्या लेकराला घेऊन माऊली पोहोचली परीक्षेला; नांदेडच्या शीतलची काळजाला भिडणारी कहाणी

Published : Feb 19, 2026, 03:35 PM IST
nanded girl shital chitte hsc exam

सार

नांदेडमध्ये २१ वर्षीय शीतल चित्ते हिने बाळंतपणानंतर अवघ्या काही दिवसांतच आपल्या १० दिवसांच्या बाळासह बारावीची परीक्षा दिली. तिच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीला पाहून कॉलेज प्रशासनाने बाळासाठी 'मातृस्नेह कक्षा'ची सोय केली. 

नांदेड : "आई" आणि "शक्ती" ही एकाच नाण्याची दोन टोके आहेत, याची प्रचिती देणारी एक थक्क करणारी घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. अंगात बाळंतपणाच्या कळा, शरीर थकलेलं आणि मन व्याकुळ... अशा परिस्थितीत जिथे धड उभं राहणं कठीण असतं, तिथे २१ वर्षांची शीतल चंद्रकांत चित्ते चक्क बारावीचा बोर्डाचा पेपर लिहिण्यासाठी परीक्षा केंद्रावर हजर झाली. १० दिवसांच्या तान्ह्या बाळाला छातीशी कवटाळून परीक्षेला बसलेल्या या माऊलीची जिद्द पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

टाके ओले असताना दिला इंग्रजीचा पेपर!

शीतलच्या धाडसाची पराकाष्ठा म्हणजे, जेव्हा इंग्रजीचा पहिला पेपर होता, तेव्हा तिच्या बाळाचा जन्म होऊन अवघे दोनच दिवस झाले होते. बाळंतपणाच्या वेदना असह्य असताना आणि टाके ओले असतानाही तिने हार मानली नाही. बुधवारी जेव्हा राज्यशास्त्राचा पेपर होता, तेव्हा ती आपल्या १० दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊनच 'पीपल्स कॉलेज' परीक्षा केंद्रावर पोहोचली.

कॉलेजमध्ये सजला 'मातृस्नेह कक्ष'

शीतलची ही चिकाटी पाहून कॉलेज प्रशासनानेही माणुसकीचं दर्शन घडवलं. प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर आणि त्यांच्या टीमने तातडीने एका विशेष कक्षाची व्यवस्था केली. तिथे बाळासाठी पाळणा लावण्यात आला. आई वर्गात पेपर लिहित असताना तिचं बाळ त्या 'मातृस्नेह कक्षात' शांतपणे झोपी गेलं होतं. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या डोळ्यांतही पाणी आले.

"हे शिक्षणच आम्हाला उभं करेल!"

दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या शीतलचा पती कामानिमित्त बाहेर असतो. घरी बाळाला सांभाळायला कोणीही नसल्याने तिला या संकटाचा सामना करावा लागला. "बाळ लहान आहे, पुढच्या वर्षी परीक्षा देऊ," असा विचार न करता शीतलने जिद्दीने पेपर देण्याचे ठरवले. ती म्हणाली, "हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे शिक्षणच उद्या मला आणि माझ्या बाळाला मानाने जगायला शिकवेल." तिच्या या संघर्षाला तिचे सासर आणि माहेरच्या मंडळींनीही खंबीर साथ दिली. शिक्षणाप्रती असलेली ही ओढ पाहून, "आम्ही अनेक विद्यार्थी पाहिले, पण अशी दुर्दम्य इच्छाशक्ती कधीच पाहिली नाही," अशा शब्दांत शिक्षण अधिकारी माधव साळगर यांनी तिचे कौतुक केले.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक