
मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन आता अधिक तीव्र होत चाललं आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी ‘मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळालं पाहिजे’ असा ठाम निर्धार घेत आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक नेते, मंत्री, आणि खासदार जरांगे यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानात येत आहेत. अशाच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे या देखील आंदोलनस्थळी पोहोचल्या आणि मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर मैदानात अचानक तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. मैदानातून बाहेर पडताना काही आंदोलकांनी त्यांना थांबवून "एक मराठा, लाख मराठा" अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी काही आंदोलकांनी शरद पवार यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. सुळे यांच्या गाडीभोवती गर्दी वाढल्याने काही क्षणांसाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र, काही संयमी आंदोलकांनी पुढे येऊन त्यांना सुरक्षितपणे गाडीपर्यंत पोहोचवले, आणि तणाव टाळण्याचा प्रयत्न केला.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव वाढताना दिसतोय. ओबीसी आरक्षणासाठी त्यांच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम राजकीय पटलावर स्पष्ट दिसत आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील घोषणांमधून समाजातील अस्वस्थता आणि असंतोष स्पष्टपणे जाणवत आहे.